संघर्ष न करता मराठवाड्याला अतिरिक्त पाणी मिळाल्याने आश्चर्य

हिंगोली जिल्ह्यातील काही उच्च पातळी बंधारे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नसल्यामुळे रखडले होते.

|| सुहास सरदेशमुख,

जलसंपदातील पाणी वापराच्या दुरुस्तीमुळे तीन जिल्ह्यांना लाभ

औरंगाबाद: कृष्णा खोऱ्यातील २१ अब्ज घनफूट पाणी मराठवाड्याला देताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी खळखळ केली होती. पण कोणताही मोठा गाजावाजा न करता मराठवाड्यासाठी अतिरिक्त १९.२९ अब्ज घनफूट पाणी मंजूर कसे झाले याची उत्तरे  शोधली जात असून अचानकपणे गोदावरी पाणी तंटा लवादातील जुनी गणिते दुरुस्त करून पाणी मंजूर झाल्याची घोषणा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. त्यामुळे अतिरिक्त पाणी मिळेल याचा आनंद होण्याऐवजी शंकाच अधिक घेतल्या जात आहेत, मात्र बदलेली गणिते ही माजलगाव धरणाच्या मंजुरीच्या तारखेत दडली असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, मध्य गोदावरीसाठी अतिरिक्त पाणी मंजूर झाले आहे. हा मंजूर वाढलेला अतिरिक्त पाणी वापर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी उपयोगाचा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  हिंगोली जिल्ह्यातील काही उच्च पातळी बंधारे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नसल्यामुळे रखडले होते. पाणी वापराच्या नव्या गणितांमुळे परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लागू शकतात. झालेले पाणी वापरातील बदल नव्याने सांगताना महाविकास आघाडी सरकारने हे सारे केल्याचे आवर्जून सांगण्यात आले. गोदावरीतील अतिरिक्त मंजूर पाणी १९७५ पासून लालफितीमध्ये अडकून पडले होते. गोदावरी पाटबंधारे महामंडळातील काही अधिकारी  बैठकांत याविषयी बोलायचे, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जायचे. तत्कालीन कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी हा प्रश्न मांडला. पण तेव्हा त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ते जेव्हा जलसंपदा विभागात अधिकार पदावर रुजू झाले त्यानंतर पाणी वापराचा विषय पुन्हा चर्चेत आला.

कसे बदलले पाणी वापराचे गणित?

पाणी वापराचे गणित बदलण्यासाठी ६ ऑक्टोबर १९७५ ही तारीख महत्त्वाची मानली जाते. गोदावरी पाणीतंटा लवादानुसार या तारखेपूर्वी ६० टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले होते. लवादाला पाणी वापर कळविण्यात आला तेव्हा माजलगाव धरणाची प्रशासकीय मंजुरी १९७५ नंतरची गृहीत धरण्यात आली. वास्तविक माजलगाव धरणाची प्रशासकीय मंजुरी १९७४ साली मिळाली. त्यामुळे माजलगावचे पाणी नव्याने उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाच्या लक्षात आणून देण्यात आले. गोदावरी पाणी तंटा लवादातील हे बदलेले आकडे लक्षात घेता नव्याने पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. विशेष म्हणजे ही चूक मान्य करून ती दुरुस्त करण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारने दाखविली. त्याचा फायदा मराठवाड्याला मिळू शकेल.

कधी मिळेल पाणी?

 मंजूर कधी पाणी मिळेल, कोणत्या प्रकल्पाला मिळेल याची उत्तरे सध्या कोणाकडेच नाहीत. मात्र माजलगाव धरणाच्या खालच्या बाजूस म्हणजे मध्य गोदावरी पाणलोटात म्हणजे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात नवीन सिंचन प्रकल्प हाती घेता येणे शक्य होणार आहे. पण मराठवाड्याला कोणतीही खळखळ करता अधिक पाणी मिळाल्याने त्याविषयी शंकाच अधिक असल्याचे चित्र आहे. पण पाणी मंजूर झाल्याने हिंगोलीचा सिंचन अनुशेष पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

माजलगाव धरणाच्या मंजुरीचे साल १९७४ असताना तो प्रकल्प एक वर्ष उशिराने मंजूर झाल्याचे कागदोपत्री नोंदविण्यात आल्याने पाणी वापरल्याचे दिसून येते. पण आता त्रुटी दूर झाल्या आहेत.          – अजय कोहिरकर, सचिव जलसंपदा 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three districts benefit from repairs to water use in water resources akp

ताज्या बातम्या