scorecardresearch

भुकेच्या समस्येमुळे ‘तिच्या’वर देहविक्रय करण्याची वेळ

अटकेतील दलालांच्या पोलीस कोठडीत वाढ

(संग्रहित छायाचित्र)

 

आई-वडिलांचे छत्र हरवलेली ‘ती’ मूळची पश्चिम बंगालमधील. लहानपणापासून अति भूक लागण्याची समस्या तिला होती. पोटासाठी तिने घरोघरचे भांडी घासण्याचे काम स्वीकारले. त्यातून तिची भेट कुंटणखाना चालवणाऱ्या कापसे दाम्पत्याशी झाली आणि कष्ट न करताही हा देह पसा मिळवून देऊ शकतो, हे त्यांनी ‘तिच्या’ मनावर बिंबवले. अखेर देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या कापसे दाम्पत्याच्या जाळ्यात ती आली, असा एक कंगोरा औरंगाबादेत उघडकीस आलेल्या कुंटणखाना चालवण्यात येत असलेल्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांना सापडला.

बीड वळण रस्त्यावरील राजेशनगर व यशवंतनगर येथे सुरू असलेल्या दोन कुंटणखान्यांवर ७ डिसेंबर रोजी पोलिसांनी छापा मारुन प्रत्येकी चार दलाल व ग्राहकांना पकडले होते. तसेच एक लाख ७४ हजार ७०५ रुपयांचा ऐवज जप्त केला होता. या प्रकरणात दलालांना ग्राहक पुरविणारा मनोज गोिवदराव जाधव या दलालाला पोलिसांनी बुधवारी रात्री गजाआड केले. याप्रकरणात प्रोझोन मॉलचा अधिकारी महंमद अर्शद व अमोल शेजूळ या दोघा ग्राहकांनाही मनोजनेच आणल्याची माहितीही पुढे आली.

राजेशनगर व यशवंतनगरातील दोन वेगवेगळ्या घरांमध्ये कोलकाता आणि हैदराबाद येथील तीन वारांगना व गारखेडा परिसरातील एका वारांगनेला पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील कोलकता येथील तरुणीला अति भूक लागण्याची समस्या असून पोट भरण्यासाठीची तिची गरज हेरून तिला देहविक्रीच्या व्यवसायात ओढल्याची माहिती पोलिसांसमोर आली. कोलकत्यातील वारांगना निराधार आहे. तिच्या लहानपणीच तिच्या आई वडिलांचे निधन झालेले आहे. जवळचे कोणी नातेवाईकही नाहीत. लहानपणापासून तिला अति भूक लागण्याची समस्या आहे. दिवसातून चार-पाच वेळा जेवायला लागते. भूक भागवण्यासाठी तिने भांडी घासण्याचे काम स्वीकारले. त्यातूनही मिळणारा पैसा भुकेची आग बुझवत नव्हता. त्यात कापसे दाम्पत्याच्या संपर्कात ती आली आणि त्यांच्यामुळे देहविक्रीच्या व्यवसायात ओढली गेल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Time to sell her to the hunger problem abn