‘व्यापार-उद्योग क्षेत्राला भाजप सरकारची चालना’

लालफितशाही जोपासणारे कायदे रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशा शब्दांत भाजपचे शामसुंदर जाजू यांनी व्यापाऱ्यांना आश्वस्त केले.

अनेक वर्षांनंतर राज्य-केंद्रात सत्तापरिवर्तन होऊन भाजपचे सरकार सत्तारूढ झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व्यापार-उद्योग क्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर चालना दिली आहे. पुढील काळात लालफितशाही जोपासणारे कायदे रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामसुंदर जाजू यांनी व्यापाऱ्यांना आश्वस्त केले.
नांदेड होलसेल र्मचट असोसिएशन, जुना मोंढा, कर सल्लागार संघटना, प्रजावाणी, डब्ल्यूआय एफसी ऑफ आयसीएआयतर्फे येथील कुसुम सभागृहात व्यापार परिषद पार पडली. त्या वेळी जाजू बोलत होते. व्यापारी, उद्योजकांच्या अडीअडचणींची आपण दखल घेत असून सरकारदरबारी त्याचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही जाजू यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांत राज्य वा केंद्रात सरकारचे अस्तित्वच जाणवत नव्हते. विशिष्ट वर्गाचे हित जोपासणाऱ्या मंडळींचा दबदबा त्यात होता. सत्तांतरानंतर मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस व केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने अल्पावधीतच विविध समाजघटकांचे हित जोपासणारे निर्णय घेतले. या अनुषंगाने प्रशासकीय रचनेतही आवश्यक ते बदल केले आहेत. निवडणुकीच्या काळात एलबीटी रद्द करण्याचे वचन भाजप व मोदींनी दिले होते. सरकार येताच त्याबाबतचा निर्णय जाहीर करून व्यापाऱ्यांना मोठय़ा त्रासातून बाहेर काढले. अजूनही काही कायदे व्यापार, उद्योग, रोजगार निर्मिती क्षेत्रात अडथळे आणणारे आहेत. त्याबाबत आपले सरकार सकारात्मक विचार करून अभ्यास करीत आहे. या अभ्यासानंतर  लालफितशाही जोपासणारे अनेक कायदे रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा दिला जाईल. बहुचर्चित वस्तू आणि विक्री कर (जीएसटी) विधेयक आम्ही संसदेत मांडले. परंतु या विधेयकाला विरोधासाठी विरोध करीत काँग्रेस व विरोधकांनी हे विधेयक अडविले आहे. त्यामुळे विकासात मोठा अडथळा निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. जन-धन योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये बँकिंग क्षेत्राकडे गोळा करण्यात मोदी सरकारचे मोठे यश आहे, त्यातून ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अंगीकारत असल्याचे दिसून येते, असेही जाजू म्हणाले.
दिल्लीच्या गणेश सेवा संघाचे महेंद्र लड्डा, सुरेश भराडिया, गंगाबिशन कांकरिया, भास्करराव पाटील खतगावकर, भाजप शहराध्यक्ष डॉ. धनाजीराव देशमुख, गौरव भारतीया, गोवर्धन बियाणी, शंतनु डोईफोडे उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. ए. गोविंद मुंदडा यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trade industry sector bjp government