छत्रपती संभाजीनगर : परळी येथील औष्णिक वीज प्रकल्पातील राख वाहतुकीतून निर्माण झालेल्या ‘दादागिरी’ च्या अनेक कहाण्या चव्हाट्यावर आल्यानंतर ओली राख उचलण्यास इच्छुक १७ ठेकेदारांना मंजुरी देण्यात आली. ३५३ रुपये प्रती टन अधिक वस्तू सेवा कर या मूल्यांसह वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरुन या ठेकेदारांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या गाड्यांना २१ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २ एप्रिलपासून पोलीस बंदोबस्तामध्ये राख वाहतूक सुरू करण्यास ऊर्जा विभागास यश आले आहे.

दादाहरी वडगाव शिवारात परळी औष्णिक वीज केंद्रातील ओली राख साठवली जाते. दाऊतपूर तसेच परिसरातील काहीजण ओली राख नेणाऱ्या कंत्राटदारांना हे राखेची वाहतूक करू देत नसत. हाणामाऱ्यामुळे पोलीस ठाण्यापर्यंत नेहमी तक्रारी जात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाई. ही बाब संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर समोर आली. हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड व त्याच्या साथीदाराकडून राख वाहतुकीमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार केले जात. त्यामुळे औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात दहशतीचे साम्राज्य असे. या परिसरातील तरुण मुले अगदी वाढदिवसाच्या कार्यक्रमातही बंदुकीतून हवेत गोळ्या उडवत होते. त्यामुळे परळीतील वीज निर्मिती केंद्राकडे परळीतील स्थानिक फारसे फिरकत नसत. निविदाधारकांना राख उचलू न देता ती वाहतूक करणाऱ्यांची एक टोळी या भागात कार्यरत होती. २ एप्रिल २०२५ पासून निविदा मंजूर करण्यात आली. राख उचलण्यास इच्छुक ठेकेदारांपैकी १८ ठेकेदारांना आता परवानगी देण्यात आली. दरम्यान, परळी औष्णिक वीज केंद्राच्या वतीने राख उचलण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. त्यांना शुल्क भरून बंदोबस्त देण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

पहिल्या टप्प्यात तीन दिवसांसाठी नंतरही काही दिवस हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवजयंती, आंबेडकर जयंती दिवशी हा बंदोबस्त अन्य कामांसाठी परत बोलावला. त्यांच्याकडून जशी मागणी होईल तसे सशुल्क बंदोबस्त पुरविण्यात येईल, असे कॉवत म्हणाले.