सुहास सरदेशमुख, लोकसत्ता
औरंगाबाद : प्रतिदिन डिझेलच्या दरात होणाऱ्या भाववाढीमुळे वाहतूक कंत्राटाची गणिते पूर्णत: बदलली आहेत. परिणामी मालमोटारी वाहतूकच निम्म्यावर आली आहे. त्यामुळे एकदाच काय भाववाढ करायची ती करा म्हणजे पुढील वर्षांत खासगी कंपन्यांबरोबर बोलणी करणे सोयीचे होईल. १ एप्रिलपासून वाहतुकीच्या दरात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे मत महाराष्ट्र राज्य ट्रक टान्सपोर्ट असोसिएशनचे फैय्याज खान यांनी म्हटले आहे. दर दिवशी काही पैशांनी केलेल्या भाववाढीमुळे गणिते पूर्णत: बिघडली आहेत. गेल्या सात दिवसात डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढले. परिणामी पुणे, मुंबई तसेच विविध राज्यातून गाडीची एकेरी वाहतूक झाली तरी ती गाडी परत येण्यासाठी तीन दिवसाचा विलंब लागत असल्याचे मालमोटार व्यावसायातील मोहंमद आतिफ यांनी सांगितले. करोनानंतर मालवाहतूक पुन्हा मूळ पदावर येत असताना आता दररोज होणारी डिझेलची दरवाढ डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे पुढील वर्षीचे वाहतूक कंत्राटे करताना दहा रुपयांची तफावत ठेवून दर करार करावे लागतील, असे वाहतूकदार सांगत आहेत. करोनाकाळात वाहतूक व्यवसायाला घसरण लागलेली होती. त्यामुळे वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाचे अनेक हप्ते थकले होते. त्यात इंधन दरवाढ झाल्याने वाहतूकदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मालमोटारीच्या व्यवसायात तीन- चार वर्षांपासून काम करणारे अमोल हामने म्हणाले,की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आता. पूर्वी चार मालमोटारी होत्या. त्यासाठी श्रीराम फायनान्सचे कर्ज घेतले होते. ते फेडण्याची शक्ती आता हळूहळू संपत चालली आहे. पूर्वी सहा टायरच्या गाडींसाठी लागणारा विमा २२ हजाराहून ५२ हजारापर्यंत गेला आहे. टायरच्या किमती वाढल्या आहेत. टोल आणि वाहतूक पोलीस हेही त्रासदायक आहेत. पूर्वी घर भागायचे, आता ते चालविताना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दररोजच्या दरवाढीच्या डोकेदुखीमुळे वाहतुकीचे दर निश्चित करणे अवघड होऊन बसले असल्याचे सांगण्यात येते. ३१ मार्च रोजी बहुतांश वाहतूक कंत्राटे संपत असतात. त्यामुळे पुढील महिन्यापासून मालवाहतुकीत मोठे बदल होतील. परिणामी महागाई दर चढाच राहील असे चित्र दिसून येते आहे.