छत्रपती संभाजीनगर – अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईचा धडाका सुरूच असून, शहरात व पैठणमध्ये मिळून केलेल्या दोन कारवाईमध्ये २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपये किंमतीचे खाद्यतेल वापरलेले असावे या संशयावरुन जप्त करण्यात आले. हे तेलाचा साठा पत्र्याच्या डब्यांमध्ये अस्वच्छ भागात केल्याचे समोर आले आहे.
राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत शनिवारी (११ जुलै) पैठण तालुक्यातील मे. बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि शहरातील मे. बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दोन व्यावसायिकांवर छापे टाकले. या कारवाईत संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला तसेच दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
तपासणीत प्रक्रिया करण्यात येणाऱ्या विभागातील यंत्रसामग्रीवर धूळ, जाळी, गंज आणि साचलेली घाण आढळली. फरशी, भिंती आणि परिसरही अत्यंत अस्वच्छ होता. त्याच ठिकाणी रॅन्सिड तेलाचे टब ठेवलेले होते. बंद रिफायनरी आणि सुरू असलेला रिपॅकिंग विभाग एकाच आवारात असल्याने तेल दूषित होण्याचा गंभीर धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. वापरलेल्या टिन्समध्ये खाद्यतेलाचे रिपॅकिंग होत असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, पी. एस. कुचेकर, पी. एस. अजिंठेकर आणि योगेश चिभडे यांच्या पथकाने केली.
प्रयोगशाळेचे काय ?
खाद्यतेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक अंतर्गत प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याचे आढळले. तपासणीवेळी तेलाचे विश्लेषण अहवाल, घाऊक स्वरूपात प्राप्त झालेल्या तेलाचे सर्टिफिकेट ऑफ ॲनालिसिस (सीओए) तसेच तांत्रिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे रिपॅकिंगपूर्वी गुणवत्ता तपासली जात होती का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वच्छतेचा अभाव
संबंधित टाक्यांवर कोणते तेल साठविले आहे याची ओळख नव्हती. टाक्यांमध्ये घाणीचा थर आढळला तसेच स्वच्छतेच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. टाक्या, पाईपलाईन आणि पॅकेजिंग साहित्याच्या फूड ग्रेड प्रमाणपत्रांचाही अभाव आढळून आला.
२.९३ कोटींचा तेलसाठा जप्त
या कारवाईत रिफाइंड पाम, सोयाबीन, कपाशी तसेच अज्ञात वनस्पती तेलाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. एकूण २.९३ कोटी रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा ताब्यात घेऊन त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
तपासणीतील प्रमुख प्रकार
वापरलेल्या टिन्समध्ये रिपॅकिंग, अत्यंत अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया, रॅन्सिड तेलाचा साठा, क्रॉस कंटॅमिनेशनचा धोका, अंतर्गत प्रयोगशाळेचा अभाव, विश्लेषण अहवाल व सीओए नसणे, तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती नसणे, ओव्हरहेड टाक्यांवर ओळख चिन्हांचा अभाव, स्वच्छतेच्या नोंदी व फूड ग्रेड प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, अशा गंभीर त्रुटी तपासणीत समोर आल्या.
