छत्रपती संभाजीनगर: सोने आणि चांदीच्या दरामध्ये कमालीचे चढ-उतार हाेत असताना तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात गेल्या दोन वर्षात ४९ किलो सोने आणि ६६२ किलो चांदीची भर पडली आहे. आता नाथ, शाक्त आणि कपालिकांची आराध्य देवता असणारे तुळजाभवानी मंदिर ‘ श्रीमंत ’ श्रेणीकडे सरकू लागले आहे. मार्च अखेरीस जेव्हा मंदिरातील सोने आणि चांदीची मोजदाद केली गेली तेव्हा २५३ किलो ३० ग्रॅम सोने आणि सुमारे चार हजार ५२३ किलो चांदी असल्याचे आढळले.

२००९ ते २०२३ या कालावधीमध्ये तुळजाभवानी मंदिरात २०४ किलो सोने आणि ३८६१ किलो चांदी होती. शिर्डीच्या साई मंदिराप्रमाणे तुळजाभवानीचा खजिना वाढू लागला आहे. मात्र, सोने वितळविण्याची प्रक्रिया अजूनही प्रशासनाला पूर्ण करता आली नाही.

२०१० मध्ये केलेल्या मोजदादीमध्ये मंदिरातील दानपेट्यांमध्ये भाविकांनी केवळ ४६ ग्रॅम सोने ५१२ ग्राम चांदी अर्पण केल्याच्या नोंदी होत्या. मात्र, गेल्या वर्षात दक्षिण भारतातून येणारी गर्दी वाढल्याचेही आवर्जून सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये १० ग्रॅम सोन्याचा सरासरी दर किमान ५५ ते ७० हजार रुपये रुपये होता. तर २०२५ मध्ये ९५ हजार ते एक लाख ४० हजार रुपयांपर्यंत गेला होता. आता तो दीड लाख रुपयांपर्यंत असला तरी जानेवारी अखेरीस सर्वाधिक एक लाख ८४ असा दर होता. तरीही देवी चरणी सोने व चांदी अर्पण करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तुळजाभवानी मंदिरात सर्वाधिक गर्दी नवरात्रीमध्ये असते. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सोने आणि चांदी अपर्ण होते. गेल्या वर्षभरात सोने व चांदीच्या दरात कमालीचे चढउतार असताना मार्च २०२६ मध्ये १० किलो ७८८ ग्रॅम सोने आणि २६७ किलो २६२ ग्रॅम चांदी भाविकांनी अर्पण केली. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ च्या तुलनेत सात किलो सोने कमी आल्याचे दिसून आले. चांदी मात्र वाढली.

सर्वसाधारणपणे दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला आणि तुळजाभवानी मंदिराची श्रीमंती वाढू लागली. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे म्हणाले, ‘ तसे पूर्वीपासून दक्षिणेतून भाविक येत. पण सोयी वाढल्या आणि भवानी मंदिराची श्रीमंती वाढू लागली, असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल. पूर्वी अनेकांनी मंदिराच्या दानपेटीमध्ये पडणारे सोने पळवले. आम्ही त्याचा पाठपुरावा केला. अनेक अधिकाऱ्यांनी मंदिरातून सोने पळवले. त्याच्या चौकशा झाल्या. अधिकाऱ्यांना दोषीही ठरवले पण कोणावर कारवाई काही झाली नाही. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी असताना त्यांनी सोने- चांदी मोजण्याची कार्यपद्धती घालून दिली. त्यानंतर सोने – चांदीच्या खजान्यात मोठी भर पडली. त्यामुळे मंदिराची श्रीमंती वाढते आहे.’

पूर्वी यात्रा दिवस अधिक होते. वेगवान प्रवासामुळे तो कालावधी कमी झाला. मात्र, देवी चरणी श्रद्धेने अर्पण केल्या जाणाऱ्या सोन्या-चांदी श्रीमंतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषत: करोनानंतर दान वाढले असल्याचे निरीक्षणही आवर्जून सांगितले जात आहे.