छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी मंदिराच्या मालकीच्या ४ हजार १२१ इनामी जमीन विक्री प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी या अनुषंगाने तक्रार केली होती. तत्कालीन निजाम शासनाने तुळजाभवानी देवीला १ सहस्र ६६६.१४ हेक्टर म्हणजेच सुमारे ४ हजार १२१.१४ एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’ देखील लागू होत नाही. असे असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा आरोप आहे.
तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री ३ हजार ३९७ एकर भूमी असतांना प्रत्यक्ष ताबा मात्र चार मठांमधील खासगी व्यक्तींकडे आहे, तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खासगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करून ६३.०३ एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली. एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत २६१ एकर जमीन तब्बल ७३ खासगी व्यक्तींच्या नावे केली. त्याच्या नोंदी सात बारा पत्रकावर नोंदवली. याशिवाय अपसिंगा आणि उफळा या गावांमधील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आल्याचा आरोप आहे. शासनाने विशेष अधिकारांचा वापर करून सर्व अनधिकृत खरेदीखते आणि ७/१२ वरील नोंदी तत्काळ रद्द कराव्यात आणि पूर्ण १ हजार ६६६.१४ हेक्टर जमीन पुन्हा तुळजाभवानी मंदिराच्या प्रत्यक्ष नियंत्रणात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणात पहिली कारवाई तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली होती. काही सातबाऱ्यावरील नावे कमी करुन जगदंबा देवस्थानच्या नावे जमिनी केल्या होत्या. मात्र, त्या कारवाईनंतर तुळजाभवानी मंदिराच्या मालकीच्या जमीन घोटाळ्यात कोणी लक्ष घातले नव्हते. मंदिरातील खजिन्यातील काही अनमोल दागिनेही गायब झाले होते. त्याची राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशी केली होती. पण कारवाई काही झाली नाही. नव्याने मंदिर मालकीच्या जमीन घोटाळयाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुळजाभवानी मंदिराकडे मोठ्या प्रमाणात सोने व चांदी आहे. मात्र, वितळविण्याचा निर्णयही अद्याप प्रलंबित आहे. या घोटाळ्यात महसूल अधिकारी चौकशी करणार का आणि त्याला किती दिवस लागतील, हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही.
