छत्रपती संभाजीनगर : शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान तुळजाभवानी मंदिरातील गर्दी यावर्षी अधिक वाढली होती. उत्पन्नामध्येही एक कोटी ७५ लाख रुपयांची भर पडल्याचे तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या वर्षी ५ कोटी ५४ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ७ कोटी ३० लाख रुपयांहून अधिक रक्कम तिजोरीत जमा झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये दुष्काळ असला तरी भाविकांची संख्या आणि उत्पन्न यात यावर्षी वाढ दिसून आली आहे.
दर्शन रांगेतून उत्पन्न वाढले
तुळजाभवानी मंदिरात दानपेटीत पडणाऱ्या रोख रकमेबराेबरच, विश्वस्त निधी तसेच मनी ऑर्डर, धनादेश, सिंहासन पूजा, कल्लोळ तीर्थ तसेच ऑनलाइन देणगी स्वीकारली जाते. उत्पन्न मोजण्याचे असे २१ लेखाशीर्ष संस्थानामध्ये आहेत. या सर्व प्रकारच्या उत्पन्नाची तुलना केली असता वाढ दिसून येत आहे. गेल्या वर्षी २२ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे कोजागरी पौर्णिमेपर्यंतच्या यात्रा कालावधीमध्ये दर्शन रांगेतून मिळणारे उत्पन्न १ कोटी ७१ लाख १० हजार रुपये होते. यावर्षी ते ३ कोटी १९ लाख ८० हजार रुपये झाले. ऑनलाइन आणि संकेतस्थळावरून देणगी देण्याचा कलही वाढला असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी कोजागरी पौर्णिमेला कर्नाटक आणि तेलंगणाहून अधिक भाविक आल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. दर्शनासाठी धर्मदर्शनाची एक स्वतंत्र रांग आहे तर देणगी देऊन दर्शनाची सोयही करण्यात आली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हाधिकारी असताना दर्शन शुल्काचा निर्णय घेतला होता. तो मंदिर उत्पन्न वाढीस पोषक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
चालत येण्याची परंपरा
गेल्या दोन दशकात तुळजापूर येथे दक्षिणेतील राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. विशेषत: कर्नाटक आणि तेलंगणामधून चालत येणारे लोकही वाढले आहेत. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू असणाऱ्या यात्रेत सोलापूरपर्यंत काही मंडळी वाहनाने येतात. पुढील अंतर मात्र वाहनाशिवाय चालत कापले जाते. यामुळे या काळात अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळवावी लागते. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या या भाविकांमुळे मंदिर उत्पन्नात मोठी वाढ दिसून येत आहे.
दक्षिणेत देवीची आणि उत्तरेत शिव उपासना
दक्षिण भारतात देवी उपासनाची मोठी परंपरा आहे. महराष्ट्रातील अनेकांच्या कुलदेवतेचे ठिकाण कर्नाटकातील बदामी हे गाव आहे. बदामी येथील बनशंकरी ते तुळजाभवानी असा प्रवास करणारे अनेक भाविका तुळजापूरमध्ये दर्शनासाठी येतात. दक्षिणेतील देवीची उपासना आणि उत्तरेतील शिव उपासना याचा मिलाफ महाराष्ट्रात घडतो. यामुळे यात्रा काळातील गर्दीचा ओघ अधिक असतो.
यावर्षी गर्दी वाढली होती. परिणामी उत्पन्नही वाढले. संकेतस्थळावरून देणगी देण्याचा कलही वाढला आहे.-कीर्तीकुमार पुजार,जिल्हाधिकारी, अध्यक्ष तुळजाभवानी मंदिर संस्थान
