छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे मुलीचा पाठलाग करून त्रास दिल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. समीर जब्बार पटेल (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणास काठ्या, पट्टे आणि अन्य शस्त्रांनी बेदम मारहाण करून ठार मारण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत इरबाज अफसर सय्यद हा तरुणही मारहाणीत गंभीर जखमी झाला. या प्रकरणी तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष देवविलास कदम ऊर्फ परमेश्वर यांच्यासह सहा जणांविरुद्ध खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉम.च्या अंतिम वर्षात शिकत होता. आरोपीच्या नात्यातील एक मुलगी आणि समीर एकाच महाविद्यालयात शिकत होते. समीर मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याची तक्रार आल्यानंतर सुमारे तीन महिन्यांपूर्वी संतोष कदम यांनी समीर व त्याच्या आई-वडिलांना घरी बोलावून समज दिली होती. त्यानंतर समीरने महाविद्यालयात जाणे बंद करून विटभट्टीवर कामास जात होता. ३ नोव्हेंबरला परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेलेला समीर सायंकाळी काकांना आणण्यासाठी तुळजापूर शहरातील घाटशिळ वाहनतळ परिसरात गेला होता. तेथून परत असताना संतोष कदम यांनी त्याला घरी नेल्याची माहिती काकांनी वडिलांना दिली. यानंतर समीरचे वडील जब्बार पटेल, फिर्यादी सरफराज जब्बार पटेल आणि लैला पटेल हे संतोष कदम यांच्या घरी पोहोचले. तेथे संतोष कदम आणि संजय जाधव यांनी जुन्या वादातून समीरला मारहाण केल्याचा आरोप आहे.
काही वेळाने संतोष कदम अन्य चार जणांना घेऊन परतले. त्यांनी समीरला जीवे मारण्याची धमकी देत बाहेर नेले. विरोध करणाऱ्या कुटुंबीयांना धमकावून घरातच थांबविण्यात आले. समीर आणि फिर्यादी यांचे मोबाइलही काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी आरोपींनी प्रणव देवकते यालाही बोलावले. दरम्यान, इरबाज सय्यद रात्री घरी परतला असता त्याच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या जखमा आढळल्या. मस्के, प्रणव देवकते आणि अन्य दोघांनी मारहाण केल्याचे त्याने सांगितले. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी समीरचा शोध घेतला असता भारतीबुवा मठाशेजारील वाहनतळ परिसरात तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार माजी नगराध्यक्ष संतोष देवविलास कदम ऊर्फ परमेश्वर, संजय विलास जाधव, प्रणव देवकते, मस्के आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब रामचंद्र मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.
