छत्रपती संभाजीनगर – दो आँखें बारा हात या चित्रपटात कैद्यांमध्ये माणुसकी रुजवण्यासाठी त्यांना बंदिस्त केलेल्या चार भींतीतून बाहेर काढून मोकळेपण देऊन सुधारण्याची एक संकल्पना मांडण्यात आली आहे. या संकल्पनेवर आधारित खुल्या कारागृहात चांगल्या वागणुकीतील प्रवृत्तीच्या कैद्यांना मोकळ्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या वातावरणाचा गैरफायदा, मूळ संकल्पनेलाच मूठमाती देण्यात येत असल्याचे उदाहरण शनिवारी समोर आले.

पैठणमधील खुल्या कारागृहातील २० बंदिवानांकडे चक्क मोबाईल फोन आल्याचे एका झाडाझडतीतून समोर आले असून, याप्रकरणी विहामांडवा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपक लिंगप्पा भोसले यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, त्यावरून सलमान शेख, रफिक शेख, रफू सोनवणे, असिफ रोशन शेख, नांगरे कनोजिया, राजेश चौधरी, मंगेश गुमसते, शकील शेख, शिवाजी वडजे, मुजफ्फर माशुक अली शेख, कृष्णा पवार, आकाश शिंदे, शेख चांदपाशा बशीर, जयसिंग राठोड, असिफ खान, धारासिंग बावरी, नरसिंग तळणीकर, जयसिंग पवार, सुनील पाटील, मुस्तफा शेख, नीलेश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार ६ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास पैठण कारागृहांतर्गत विहामांडवा येथील शेती परिसरात अचानक तपासणी करण्यात आली. या शोध मोहिमेदरम्यान कैद्यांकडे मोबाईल फोन आणि इतर प्रतिबंधित वस्तू आढळून आल्या. प्रशासनाने एकूण ५८ हजार ७३० रुपये इतक्या किमतीचे साहित्य, वस्तु जप्त करण्यात आले. कारागृहातील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर मध्य विभागाचे विशेष कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानुसार ७ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास अतिरिक्त अधीक्षक सचिन साळवे यांच्या पथकाने विहामांडवा येथील शेत शेडवर अचानक छापा टाकला. या पथकाला बंदीवान राहत असलेल्या ठिकाणी झडती घेतली असता येथे मोबाईल फोन आणि इतर प्रतिबंधित साहित्य सापडले. कारागृह कर्मचारी सलमान शफिक शेख यांनी पदाचा गैरवापर केल्याचे या कारवाईतून समोर आले. त्यानंतर पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन पंडित यांच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला.

पैठणच्या खुल्या कारागृहातून कैद्यांनी पलायन केल्याच्या काही घटना अनेकवेळा घडलेल्या आहेत. चांगल्या वागणुकीच्या हमीवर खुल्या कारागृहात पाठवण्यात येणाऱ्या कैद्यांच्या निवडीवरच वरील घटनांमुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, त्यातून काही गैरप्रकार होत आहेत का ? अशी प्रश्नार्थक चर्चा सुरू झाली आहे.