औरंगाबादमध्ये शालेय पटावरील अडीच हजार विद्यार्थी गायब

मागील वर्षी मार्च महिन्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारने टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेतला.

नव्या वर्षांत पटनोंदणीसाठी शिक्षकांसमोर पेच

औरंगाबाद : करोनाकाळात शहरातील विविध भागात राहणारे परप्रांतीय मजूर गावी परतल्याने त्यांच्या मुलांची नावे आता शाळेच्या पटावर ठेवायची की नाही असा शिक्षकांसमोर संभ्रम आहे. असे सुमारे अडीच हजार विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत शिकत होते. आता त्यांचा पत्ताही सापडेना आणि मुलेही संपर्कात नसल्याचे शिक्षक सांगत आहेत.

मागील वर्षी मार्च महिन्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारने टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेतला. उद्योग, व्यवसाय, बांधकामे यासह सर्व बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व परप्रांतातून आलेल्या मजुरांचे काम बंद झाल्यामुळे त्यांचे प्रचंड हाल सुरू झाले. काम नसल्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे परप्रांतीय मजुरांनी कुटुंबासोबत गाव गाठले, ते अद्यापही परतलेले नाहीत. त्यामुळे त्यांची मुले शिकत असलेल्या शाळांच्या अडचणी वाढल्या आहेत. महापालिकेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांंना ऑनलाईन शिकवले जात असले तरी अत्यंत गरीब असलेल्या विद्यार्थ्यांंना  घरोघरी जाऊनही शिक्षक शिकवत आहेत. मनपाच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी परप्रांतीय मजुरांनी आपल्या मुलांची नावे घातली आहेत. बहुतेक शाळांमधील या विद्यार्थ्यांंना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची तयारी आहे, मात्र या विद्यार्थ्यांंचा पत्ता सापडत नसून त्यांचा शोध लागत नसल्याचे दिसून येत आहे.

या भागातील शाळांत विद्यार्थी गैरहजर

चिकलठाणा, नारेगाव, पडेगाव, सातारा—देवळाई, सादातनगर, जटवाडा, बेगमपूरा, रोशनगेट, कटकटगेट, आरेफ कॉलनी, भीमनगर, भावसिंगपूरा, भारतनगर, जयभवानीनगर या भागात सर्वाधिक परप्रांतीय मजूर राहत होते. या भागातील मनपा शाळांमध्ये त्यांनी मुलांना घातलेले आहे. परंतु सध्या ही मुले शिकण्यासाठी ऑनलाईन उपस्थित नसतात. ही संख्या अडीच हजार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two and a half thousand students go missing in aurangabad ssh