छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील उजव्या कालव्यात सोमवारी रात्री उशिरा वाहून गेलेल्या कारमधील तिघांपैकी एका महिलेचा व वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर वाहून गेलेल्या व्यक्तीचाही मृतदेह बीड जिल्ह्यातील गेवराईजवळच्या अनुक्रमे गुळज व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमा भागातील खाम पिंपरी येथे तब्बल ३६ तासानंतर बुधवारी पाण्यावर तरंगताना आढळून आले. निलोफर मुखीद शेख व रावसाहेब खडेकर, अशी मृतांची नावे आहेत.
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील मुखीद अहेमद शेख व त्यांची पत्नी निलोफर मुखीद शेख हे कारने प्रवास करत पिंपळवाडीकडे निघाले होते. येताना मुखीद शेख यांनी त्यांचा मेहुणा अल्ताफ हिदायत पठाण यास हादगाव (ता. शेवगाव) येथून सोबत घेतले. पैठणकडे कारने जात असताना चांगतपुरीनजीकच्या उजव्या कालव्याजवळ रात्रीच्यावेळी रस्ता कळेना म्हणून त्यांनी वाहन थांबवून मागे घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांची कार उजव्या कालव्यात कोसळली. कार पडल्याचे पाहून त्यातील सदस्यांना वाचवण्यासाठी रावसाहेब खडेकरांनीही कालव्यात उडी घेतली. परंतु ११०० क्युसेकने वाहणाऱ्या पाण्याच्या वेगाने कार व त्यातील सदस्यांसह वाचवणाराही वाहून गेला. यातील अल्ताफ कसाबसा बाहेर आला तर मुखीद व निलोफर हे कालव्यात बुडाले. त्यांच्यासोबत चांगतपुरी गावातील रावसाहेब खडेकर हा तरुणही वाहून गेला. या सर्वांचा मंगळवारी दिवसभर शोध घेण्यात आला. परंतु शोध पथकाला कोणीही सापडले नाही. अखेर बीडच्या गेवराई तालुक्यातील गुळज येथे निलोफर यांचा तर खाम पिंपरी येथे खडेकर याचा मृतदेह आढळून आला. अजूनही बुधवारी सायंकाळपर्यंत मुखीद शेख यांचा शोध लागलेला नव्हता.
मंगळवारी दिवसभर कालव्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या बोटीने बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात आला. परंतु कोणीही सापडू शकले नाही. ग्रामस्थांची मोठी गर्दी घटनास्थळी होती. सायंकाळी वाहून गेलेली कार कालव्याबाहेर काढण्यात यश आले. परंतु बेपत्ता झालेल्यांचा शोध लागला नाही. अखेर जिल्ह्याच्या सीमेबाहेर बीड व अहिल्यानगरच्या हद्दीत दोन मृतदेह सापडले.

