छत्रपती संभाजीनगर – पैठण येथील गोदावरी नदी पात्रात एका वारकरी शिक्षण संस्थेतील दोन मुले बुडाली. यातील एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून, दुसऱ्याचा शोध सुरू होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. रांगारहाटी येथील शिक्षण संस्थेतील चार विद्यार्थी दुपारच्या सुमारास खेळता खेळता गोदावरी नदीच्या पात्रात उतरले होते.

वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने यातील चैतन्य अंकुश बदर (वय १३, रा. वालसा खालसा ता. भोकरदन) व भोलेनाथ कैलास पवळे (वय १०, रा. चितेगाव ता. पैठण) हे दोघे बुडाले. पैकी चैतन्य बदर याचा मृतदेह गोदापात्रात आढळून आला असून भोलेनाथ पवळे याचा शोध सुरू होता, असे छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन विभागाचे अधिकारी अशोक खांडेकर यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पैठणचे उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथक व अग्निशामक दलाच्या १२ जवानाच्या मदतीने शोध कार्य करण्यात आले.