वीस दिवसांपूर्वी हेमलकसावरुन औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात आणल्या गेलेल्या रेणू नावाच्या मादी बिबटय़ाने तीन पिल्लांना जन्म दिला. तथापि त्यातील दोन बछडय़ांचा आज मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहेत. डॉ. आमटे यांच्याकडून सिद्धार्थ उद्यानात आल्यापासून रेणू काही खात नसल्याने तिच्यावर उपचार करताना दिलेल्या औषधांचा परिणाम बछडय़ांवर झाला असावा, असे मत व्यक्त होत आहे. तिसऱ्या पिल्लावर आता खासगी वैद्यकीय अधिकारी बोलावून उपचार सुरू आहेत.
रेणू गरोदर आहे, याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना नसल्याने केलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणी संग्रहालयास भेट दिली. रेणूला प्रसूतीच्या कळा असल्याने ती खात नव्हती, हे सिद्धार्थ उद्यानातील अधिकाऱ्यांना शेवटपर्यत समजलेच नाही. मंगळवारी तिला तीन पिल्ले झाली, तेव्हाच हे स्पष्ट झाले. यातील एका बछडय़ाला वाचवण्यास आता प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी खासगी डॉक्टरांनाही बोलावण्यात आले. नुकत्याच जन्मलेल्या कुत्रीच्या पिलास दिल्या जाणाऱ्या दुधाच्या पावडरचे दूध आता तिसऱ्या वाचलेल्या पिल्लास दिले जात आहे.
जन्मल्यानंतर दूध न पिणाऱ्या पिलास शेळीचे दूध पाजण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तथापि सकाळी दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारादरम्यान देण्यात आलेल्या औषधोपचाराची मात्रा आणि रेणूचे गरोदरपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना का समजले नाही, याची चौकशी करण्याची मागणी उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, बापू घडामोडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.