दोघे नायजेरियन ताब्यात

नोकरीचे आमिष दाखवून व आकर्षक उत्पादनांसह परकीय चलनाचे प्रलोभन दाखवून बँकेमार्फत १५ लाख रुपये लुबाडून फसवणूक करणाऱ्या दोघा नायजेरियन भामटय़ांना औरंगाबाद पोलिसांनी दिल्लीत ताब्यात घेतले. या दोघांचे बँक खाते सील केले असून या खात्यात ८ लाख रुपये असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.

औरंगाबादेतील फिर्यादी महिलेशी फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटद्वारे संपर्कात राहून या भामटय़ांनी जाळे टाकले. त्यात अलगद अडकलेल्या महिलेचा विश्वास संपादन करून दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या जेम्स डय़ूक व गिल पीटरसन या दोघा नायजेरियन युवकांनी मेजर, मरीन टूर, वर्ड क्लास वाइल्डलाइफ अँड क्लेसियर क्रुइसेस या कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवले. या बरोबरच अ‍ॅपल कंपनीची उत्पादने, सोन्याच्या साखळीचे पार्सल पाठवून त्यासह अडीच लाख अमेरिकन डॉलरची रक्कम असल्याचे भासवताना भारतात ही रक्कम पाठवण्यास अधिकृत परवानगी नसल्यामुळे फिर्यादीवर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल होण्याची व अटकेची भीती दाखवून फिर्यादीस दिल्ली येथील आयसीआयसीआय बँकेच्या खाते क्रमांकावर १५ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. शहरातील सायबर क्राइम विभागाने तपास केला. यातील आरोपी दिल्लीतील मेहोरुली भागात वास्तव्यास असल्याचे समोर आले. क्रांती चौक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करून दोघा नायजेरियन आरोपींना ताब्यात घेतले. उजेह ऑगस्टीन उगो चिक्वू व चुक्वीन जॉर्ज अशी त्यांची नावे आहेत.