परभणी : आज मंगळवारी (दि.३) पहाटे अडीच वाजता मंठा नजीक असलेल्या गणेशपुर जवळ जिंतूर- जालना रस्त्यावर झालेल्या अपघातात पत्रकार नितीन धूत (वय ६३) आणि जिंतूर येथील सहाय्यक निबंधक संजय अबदागिरे (वय ५५) यांचा मृत्यू झाला. तर ॲड. मनोज तोष्णीवाल व विजय ताडकळसकर हे दोघे जखमी झाले.

अस्ट्रो कार (एम एच २२- ए डब्ल्यू ५११५) आणि ब्रिझा कार (एम एच १४- एफ एस ०८९७) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातातील सर्वच जखमींना उपचारार्थ दाखल करण्याचा प्रयत्न झाला पण त्यातील धूत यांचा जागेवरच मृत्यू झाला होता तर अबदागिरे हे दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू पावले. धूत हे परभणी येथे एका स्थानिक दैनिकाच्या आवृत्तीचे निवासी संपादक होते. ताडकळसकर यांच्यावर परभणीच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.