औरंगाबाद : ऊसतोड मजुरांना बारामतीकडे घेऊन जाणारे वाहन रस्त्यात उभ्या ट्रकवर धडकून झालेल्या अपघातात एक महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. तर एका बालकासह पाच जण जखमी झाले. जखमींवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे सिल्लोड-कन्नड मार्गावरील धानोरा फाटय़ाजवळ घडली. कल्पनाबाई इमाजी पवार (वय ३७) व प्रशांत विठ्ठल वाघ (वय ३६), अशी मृतांची नावे आहेत. कल्पनाबाई पवार या पाचोरा तालुक्यातील मोहाडी तांडा येथील तर प्रशांत वाघ हे सोलापूरच्या माळसिरस तालुक्यातील हनुमंतवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती घटनेतील सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी रामेश्वर जाधव यांनी दिली. या घटनेत रुक्मिणबाई किसन पवार (वय ६०, रा. िपपळगाव तांडा), सागर किसन पवार (वय २०), अनिल गंगाराम तवत (वय २८), सुभाष ईदल राठोड (३२), नीलेश इमाजी पवार (वय ८) हे जखमी झाले. जखमींना मिच्छद्र पवार यांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून औरंगाबादच्या घाटीत हलवण्यात आले. मृत व जखमींसह इतर २० ते २५  ऊसतोड मजूर हे पाचोरा तालुक्यातील असून ते ऊसतोडीसाठी बारामतीकडे एका कंटेनरमधून जात होते. धानोरा फाटय़ाजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या एका मालमोटारीला कंटनेर धडकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two sugarcane workers killed in road accident zws
First published on: 23-10-2021 at 02:09 IST