हिंगोली : “शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वीही झाले आणि आताही सुरू आहेत. खासदार, आमदार पक्ष सोडून जाऊ शकतात, पण निष्ठावान शिवसैनिक कधीच विकला जात नाही. त्यामुळे शिवसेना संपणार नाही, उलट अधिक ताकदीने पुढे जाईल,” असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.या बंडखोरांवर विश्वास ठेवणे ही माझी चूक होती. त्यासाठी मी शिवसैनिक आणि जनतेची जाहीर माफी मागतो,” असेही ठकरे यावेळी म्हणाले.
शहरातील महावीर भवन येथे शनिवारी (२७ जून) सायंकाळी साडेसहा नंतर पार पडलेल्या शिवसैनिकांच्या आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी खासदार चंद्रकांत खैरे व शिवाजी माने, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, अजय उर्फ गोपू पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात शेतकरी आत्महत्या, नीट व टीईटी पेपरफुटी, वाढते गुन्हे आणि बेरोजगारी यांसारखे गंभीर प्रश्न असताना सत्ताधारी मात्र पक्ष फोडा-फोडीच्या राजकारणात गुंतल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. दोन-तृतीयांश बहुमताच्या हव्यासापोटी लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याची जोरदार टीकाही यावेळी त्यांनी केली.हिंगोली-परभणीची शिवसैनिकांची निष्ठा ही शिवसेनेची खरी ताकद असल्याचे सांगत, “पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेता येईल, पण शिवसैनिकांची निष्ठा कोणालाही चोरता येणार नाही,” असे ते म्हणाले. शक्तीपीठ महामार्गासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक खासदारांनी कधी रस्त्यावर उतरून संघर्ष केला का, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेत बुरखा घालून वावरणारे आता उघडे पडले आहेत. खोटारडेपणा त्यांच्या रक्तात भिनला असून बंडखोरी करणाऱ्यांना जनता राजकारणातून कायमचे बाजूला करेल,” असा घणाघात करत त्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावरही अप्रत्यक्ष जोरदार निशाणा साधला.ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या सेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा दौरा असून, हिंगोलीतील बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या क्षेत्रात शनिवारी सायंकाळी ठाकरे यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
