औरंगाबाद : पाऊस एवढा झाला की, मक्याच्या कणसाला जागेवर कोंब फुटले. उभे पीक पाण्यात करपून गेले. पेंढापूर या गंगापूर तालुक्यातील शेतकरी प्रेमचंद धरमसिंग राजपूत सांगत होते, ‘ना पीक विमा मिळाला ना अतिवृष्टीची मदत. एकदा मंडळ अधिकारी येऊन गेले. त्यानंतर कोणी फिरकलेच नाही. अतिवृष्टीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत काही मिळाली नाही.’ गावोगावी अनेक शेतांत अजून शेतात पायही ठेवता येत नाही. फक्त ऊस वगळला तर सारे पीक हातचे गेले आहे, अशा काळात राज्य सरकारवर टीका करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेती प्रश्नी घेराव करू, असे संकेत दिले.

या प्रश्नी स्वत:ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेतील पडझडीनंतर संघटन बांधणीबरोबरच विरोधकांना अडचणीत आणणारे मुद्दे उचलले जातील, असा संदेश त्यांनी ग्रामीण भागात द्यायला सुरुवात केली आहे. वाढणारा रोष अधिक टोकदार करत कार्यकर्ते टिकवून धरले जातील अशी रचना आकाराला येऊ शकते काय, याची चाचपणी उद्धव ठाकरे यांनी केल्याचे मानले जात आहे.

 धोरणाच्या पातळीवर राष्ट्रीय आपत्तीची निधीचे निकष बदलण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. हे काम केंद्रीय पातळीवर नव्याने हाती घ्यावे यासाठी शिवसेनेचा जोर वाढू शकेल. वारंवार होणारी अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे मराठवाडय़ाच्या हवामानात या मुद्दय़ाला अधिक वाव मिळू शकतो. मात्र, शिवसैनिकांना आता मुद्दय़ाची भाषा समजून सांगणे हे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर आणि ते पद सोडल्यानंतर ठाकरे यांच्या भाषेत होणारे बदलही आता जाणवू लागले आहेत. घोषणांची अतिवृष्टी करणारे निर्दयी सरकार भावनाशून्य तर आहेच, पण उत्सवीही आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दौऱ्यादरम्यान केली; पण हेक्टरी अनुदान किती द्यावे ही मागणी शिवसेनेची नाही तर शेतकऱ्यांची आहे. त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.  हेक्टरी ५० हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांची आहे, त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. पूर्वी शिवसेनेकडून होणाऱ्या मागण्या बऱ्याचदा सरधोपट असत. आता त्यात बदल झाल्याचेही दिसून येत आहे.

एका बाजूला हा दौरा सुरू असतानाच गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव या गावातील शेतकऱ्याच्या मुलास नवे कपडेही घेता येत नाही. कारण शेतकरी वडिलांकडे पैसेच नाहीत, हे चित्र पुढे आले होते. या मुलांची भेट  घेऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या मुलाशी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिले होते. त्यामुळे शेतीप्रश्नी शिवसेना आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच  कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी सकाळीच ज्ञानेश्वर चव्हाण या शेतकऱ्याचे घर गाठले. त्यांच्या मुलाला नवे कपडे, शिक्षणासाठी ५० हजार रुपये आणि दिवाळीचा फराळ, ‘आनंदाचा शिधा’ आदी वस्तू आवर्जून नेऊन दिल्या. हे करताना त्या प्रत्येक वस्तूवर ‘मी एकनाथ शिंदे समर्थक’ अशी अक्षरेही आवर्जून लिहिली होती. ही मदत मुख्यमंत्र्यांकडून दिली जात आहे, असे सत्तार यांनी ठसविण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला हे सारे घडत असताना उद्धव ठाकरे यांनी पीक विम्याच्या प्रकरणातही शिवसेना लक्ष घालेल असे संकेत दिले. बीड पॅटर्नचे तांत्रिक तपशील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवेत, असेही ते म्हणाले.  त्यामुळे शेतीप्रश्नावर शिवसेना आक्रमक राहील असे संकेत दिले जात आहेत.

शेती पंचनाम्यांच्या प्रश्नावरून सरकारची कोंडी करण्याची तयारी 

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, त्यातील तांत्रिक बारकावे याचे तपशील गोळा होण्यास अजून १० ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. ज्या भागात अतिवृष्टी झाली होती, त्या भागातील पंचनामे पूर्ण होईपर्यंत नव्याने नव्या ठिकाणी नुकसान होत होते. त्यामुळे रडतखडत झालेले पंचनामे पुन्हा कसे करायचे, असा पेच यंत्रणेसमोर होता. ‘सततच्या पावसामुळे झालेले नुकसान’ या सदराखाली पुन्हा सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे; पण दिवाळीमुळे पंचनामे पुन्हा रखडलेले आहेत. या काळात शिवसेनेने शेतीप्रश्नावरून राज्य सरकारची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे.