मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश पी. व्ही. रमण. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्यासमोरच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना कोपरखळ्या मारल्यात. महाराष्ट्रात असं एक प्रकरण आहे जेथे तक्रारदारच बेपत्ता आहे, असं म्हणत त्यांनी परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुली प्रकरणी केलेल्या तक्रारीवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारत उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं काय झालं?

औरंगाबाद खडंपीठाच्या इमारत उद्घाटन कार्यक्रमात न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील १९५८ पासून प्रलंबित एका खटल्यावर भाष्य केलं. यावर उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी १९५८ मधील एका खटल्याचा उल्लेख केला त्यात आरोपी फरार असल्यानं तो प्रलंबित आहे. मात्र, महाराष्ट्रात एक असाही खटला आहे ज्यात तक्रारदारच बेपत्ता आहे. या तक्रारदाराने गंभीर आरोप करत तक्रार दिली, मात्र आता स्वतः बेपत्ता आहे. तक्रारदार कुठं आहे हे आम्हाला माहिती नाही. आपण लक्ष घालायला हवं अशी ही गोष्ट आहे.”

हेही वाचा : “ …तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला देखील झालो असतो ” ; उद्धव ठाकरेंचं विधान!

नाव न घेता परमबीर सिंह यांच्यावर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांच्यावर नाव न घेताच अप्रत्यक्ष निशाणा साधला. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सचिन वाझेसह काही अधिकाऱ्यांना अटकही झाली. मात्र, आता परमबीर सिंहच बेपत्ता झाल्यानं या प्रकरणातील रहस्य वाढलंय. दरम्यान, परमबीर सिंह बेपत्ता झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनं कारवाईपासूनचं संरक्षणाचं आश्वासन पाळता येणार नाही असं न्यायालयाला सांगितलं आहे.