आता श्रेयासाठी स्पर्धा : उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप लक्ष्य; २९ जूनला पुन्हा मराठवाडा दौऱ्यावर

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे फॅशन, असे मानणाऱ्यांकडून कर्जमुक्ती करून घेतली. हे श्रेय घेण्याचा प्रयत्न नाही. मात्र, हीच वस्तुस्थिती आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ शिवसेनेमुळे भाजपला झुकावे लागले, असा दावा केला. कर्जमाफी शिवसेनेने करून दिली, असे सांगणाऱ्या उद्धव  यांना माळीवाडा येथील सेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात  शेतकऱ्यांकडून एक बैलगाडीची प्रतिकृती आणि घोंगडी भेट देण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी समृद्धीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. पळशी येथील शेतकऱ्यांनी त्यांना ‘आसूड’ भेट दिला. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत सुरू असणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या खात्याचे मंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आहेत. याच खात्याच्या विरोधात तक्रारी करत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या हाती ‘आसूड’ दिला.

कर्जमाफीच्या निर्णयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चौकाचौकात जल्लोष केला, फलक लावले. सेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र या निर्णयाचे श्रेय कसे घ्यायचे, असा प्रश्न होता. यासाठी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफी शिवसेनेमुळेच कशी झाली, हे सांगितले. पुणतांब्यावरून ११ मे रोजी काही शेतकरी आले होते. ते म्हणाले, आता आम्ही पिचलो आहोत. संप केल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा तुमच्याबरोबर शिवसेना आहे, असे सांगून शेतकऱ्यांबरोबर सेना रस्त्यावर उतरली होती. सेना आणि शेतकरी एकत्र आल्यामुळेच सरकारला झुकावे लागले, असे ठाकरे म्हणाले. कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय शिवसेनेला मिळावे, अशी मांडणी त्यांनी औरंगाबाद तालुक्यातील माळीवाडा आणि पळशी येथे घेण्यात आलेल्या छोटेखानी सभांमध्ये केली. श्रेय शिवसेनेच्या पदरात पडावे यासाठी भाजपचे नेते कसे शेतकरी विरोधी आहेत, हे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ‘साले’चे वक्तव्य, वेंकय्या नायडू यांचे ‘कर्जमाफी आता फॅशन बनते आहे’ या वक्तव्यांचा आधार घेतला. युतीत खोडा घालण्याचा ठपका असणारे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यांचाही ठाकरेंनी समाचार घेतला. ‘मोबाईल बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे असतात, पण वीजबिलासाठी नाही’ या वक्तव्यावरून ठाकरे यांनी त्यांना लक्ष्य केले. भाजपचे नेते शेतकऱ्यांच्या विरोधात कसे आहेत, हे सांगत ठाकरे यांनी ‘समृद्धी’ विरोधालाही खतपाणी घातले.

मुंबई-नागपूर या ७०१ किलोमीटरच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता, त्यांचे समर्थन मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद येथे नुकतीच एक परिषद घेतली होती. मात्र, समृद्धी महामार्गात ज्यांच्यावर अन्याय होतो आहे, अशा शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांसोबत सुसंवाद घडवून आणू, असे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यांच्या या समन्वयी भूमिकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘समृद्धी’तील बाधित शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्याचे ठरविले. ‘समृद्धी’ विरोधातील सूर अधिक व्यापक व्हावा यासाठी खरे तर भाकपने अधिक मेहनत केली होती. ‘समृद्धी’ नव्हे ‘बरबादी’ मार्ग असे घोषवाक्य त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत नेले.

सोमवारी हे घोषवाक्य शिवसेनेच्या फलकावर झळकत होते. स्वत: उद्धव ठाकरे यांनी ‘समृद्धी’ विरोधाला खतपाणी घातले. मात्र, पत्रकार बैठकीत त्याला फारसा विरोध केला नाही. ज्या शेतकऱ्याची सुपीक जमीन जात आहे तेथून तो मार्ग न जाऊ देता पूर्ण होऊ शकतो काय? पूर्वीचा मार्ग रुंद केला तर पर्याय निघू शकतो काय, याची चाचपणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘मातोश्री’वर बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रेघोटय़ा ओढून विकास होत नसतो. कपाळकरंटे निर्णय घेत माझं थडगं उभं राहत असेल तर ती ‘समृद्धी’ मी बघू कशी, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांच्या जगण्याची राखरांगोळी करणार असाल तर ती आम्हाला नको आहे. कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला झुकवलंच आहे. आता ‘समृद्धी’साठी आंदोलन करण्याची वेळ आणू नका, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, असा संदेश देण्यासाठी पळशी येथे उभारण्यात आलेल्या सभामंडपाच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे खाली आले. म्हणाले, मुद्दामहून खाली आलो आहे. पाय जमिनीवर असलेले बरे असतात. यावेळी शेतकऱ्यांनी हा मार्ग केला जाऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी हातात ‘आसूड’ घ्यावा, अशी विनंती केली. त्यावर ठाकरे म्हणाले, सरकार बदलल्यानंतरही शेतकरी माझ्या हातात आसूड देत असतील तर सरकार बदलून उपयोग काय?

कर्जमाफीच्या श्रेयाबरोबरच ‘समृद्धी’चा आसूड हातात धरत शिवसेना पक्षप्रमुख २९ जूनला पुन्हा मराठवाडय़ात येणार आहेत. औरंगाबाद ते नांदेड असा पुढचा दौरा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

  • कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय शिवसेनेला मिळावे, अशी मांडणी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या माळीवाडा आणि पळशी येथे घेण्यात आलेल्या छोटेखानी सभांमध्ये केली.
  • श्रेय शिवसेनेच्या पदरात पडावे यासाठी भाजपचे नेते कसे शेतकरी विरोधी आहेत, हे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ‘साले’चे वक्तव्य, व्यंकय्या नायडू यांचे ‘कर्जमाफी आता फॅशन बनते आहे’ या वक्तव्यांचा आधार घेतला.
  • युतीत खोडा घालण्याचा ठपका असणारे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यांचाही ठाकरेंनी समाचार घेतला.