छत्रपती संभाजीनगर : पक्ष बदलून जाणाऱ्या किंवा फूट पाडणाऱ्या आमदार – खासदारांना शिवसैनिक ‘ गद्दार ’ असे विशेषण लावून हिणवतात. अशा नव्याने फुटीत सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात आता आता पुन्हा एकदा ‘ निष्ठावंत’ च्या बैठका सुरू झाल्या असून तालुकानिहाय बैठकानंतर पक्षप्रमूख उद्धव ठाकरे या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा पदाधिकारी जोडून ठेवण्याची नवी कसरत मानली जात आहे. २६ ते २९ या तीन दिवसात पहिल्या दिवशी मुंबईहून यवतमाळ ते येणार आहेत. दुसऱ्या दिवशी वाशिम आणि हिंगोली येथे सभा असून परभणी येथे ठाकरे मुक्काम करणार आहेत.

परभणी मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी पहिल्यांदा आपण शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याविषयी जाहीर वक्तव्य केले होते. या मतदारसंघात डॉ. राहुल पाटील आणि अंबादास दानवे हे सभांची तयारी करणार आहेत. या मतदारसंघातील तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी खासदारांबरोबर शिंदे सेनेमध्ये जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केल जात आहेत. गेल्या काही महिन्यापासून परभणीत फूट पडणार हे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना माहीत होते. आता आमदार राहुल पाटील हे उर्वरित संघटनेकडे लक्ष घालत आहेत.

धाराशिवमध्ये ओम राजेनिंबाळकर यांच्या फुटीनंतर नंदू राजेनिंबाळकर यांच्याकडे पदाधिकाऱ्यांशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदू राजेनिंबाळकर हे धाराशिवचे नगराध्यक्ष होते. सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये शहर संपर्क प्रमूख म्हणून काम करत आहेत. त्यांनी तालुका पातळीवरच्या बैठका घेऊन सभेची तयारी सुरू केली आहे. आमदार कैलास पाटील आणि नंदू राजेनिंबाळकर हे सभेची तयारी करत आहेत. पावसाळी दिवस असल्याने ठाकरे यांच्या बहुतांशी सभा मंगलकार्यालयात आयोजित केल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात पदाधिकारी सारे ठाकरे यांच्याबरोबरच आहेत, असे आवर्जून सांगण्यात आले.

मराठवाड्यात आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तीन आमदार आहेत. यामुळे परभणीमध्ये राहुल पाटील व धाराशिवमध्ये कैलास पाटील आणि उमरगा येथे प्रवीण स्वामी यांचा समावेश आहे. या तिन्ही आमदारांच्या मदतीने पदाधिकारी जोडून ठेवण्यासाठी ठाकरे हा दौरा करत असल्याचे सांगण्यात येत आहेत. या पूर्वी २०२२ मध्ये झालेल्या फुटीनंतरही ठाकरे यांनी मराठवाड्यात ‘ फुटीर ’ नेत्यांच्या मतदारसंघात दौरे केले होते. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्य ा पदरी अपयशच आलेच होते.

विशेषत: छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी फूट पडली होती. मंत्री संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार हे पाच आमदार फुटले होते. या मतदारसंघात तेव्हा – ‘५० खोके..’ ही घोषणा आवर्जून दिली जात असे. संदीपान भुमरे हे कसे मद्य विक्रेते आहेत, हेही सांगून झाले. मात्र, हे पाचही नेते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. याशिवाय अन्य आमदारही निवडून आले. यात उमरगा येथील ज्ञानराजे चौघुले हे अपवाद. ते पराभूत झाले. ठाकरे यांच्या पूर्वीच्या दौऱ्यामुळे नेत्यांवर टीका झाली तरी निवडणुकीमध्ये ठाकरे यांना यश मिळालेले नव्हते, असे आता आवर्जून सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे यांचा दौरा पदाधिकारी जोडून ठेवण्यासाठी असल्याचे मानले जात आहे.