छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादातून पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने पतीने वार करून निर्घृण हत्या केली. मंगळवारी ७ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अजित अपन्ना वासुदेव असे आरोपीचे नाव असून लिंबूबाई (पत्नी) आणि मानसी (वय ८) अशी मृतांची नावे आहेत.

मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास अजित वासुदेव हा रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुरूम पोलीस ठाण्यात दाखल झाला. “मी माझ्या पत्नीचा आणि मुलीचा कुऱ्हाडीने खून केला आहे,” अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. ​घटनेचे गांभीर्य ओळखून मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीपान दहिफळे यांनी तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

घरामध्ये आई आणि मुलीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरूम ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. ​

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक ​रितू खोकर, उमरगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ​सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. ​लातूर जिल्ह्यातील वाडी कासारशिरसी येथील नागनाथ शेंमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजित वासुदेव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.