बीड – एका हॉटेल व्यावसायिकाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलेला आणि विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त पाहणारा उमेश माने याला अखेर केज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या विकृत आरोपीला १ सप्टेंबर रोजी टाकळी येथील त्याच्या घरातूनच शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

उमेश माने याने एका विवाहित महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले होते. ‘व्हिडीओ व्हायरल करेन आणि पती-मुलांना संपवून टाकेन,’ अशी धमकी देत तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिला. अखेर या संतापाचा स्फोट २० जून रोजी झाला. केज-मांजरसुंबा रस्त्यावरील बळीराजा हॉटेलजवळ पीडितेचे नातेवाईक आणि उमेश माने यांच्यात जोरदार राडा झाला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेल्या उमेश मानेला वाचवण्यासाठी हॉटेल मालक विलास घुले पुढे आले; मात्र, संतप्त जमावातील एकाने घुले यांच्यावरच धारदार शस्त्राने सपासप वार केले.

गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांचा २१ जून रोजी अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. विलास घुले यांच्या खुनानंतर रमेश घुले यांच्या फिर्यादीवरून १० जणांवर गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव पुरवणी जबाबात आल्याने संपूर्ण राज्यात प्रचंड राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली होती.

गुपचूप गावात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

आरोपी उमेश माने हा टाकळी येथे आपल्या घरी लपून बसल्याची पक्की खबर निरीक्षक सूर्यतळ यांना मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, नितीन वारे, राहुल तरकसे, पूजा माके आणि अनिता दगडखैर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला घरातूनच मुसक्या आवळल्या .