छत्रपती संभाजीनगर – एखाद्या राखाडी लाकडासारख्या रंंगाचा शिंगधारी कीटकाची दुर्मिळ ‘युनिकाॅर्न मँटिस’ची नोंद वैजापूर तालुक्यातील लाडगाव परिसरात झाली आहे. तज्ज्ञांच्या मते मँटिस हा शतीसाठी उपयुक्त कीटक असून, पिकांवरील हानिकारक कीटकांचे भक्षण करत असून, मराठवाड्यातील जैवविविधतेच्या अभ्यासासाठी ही महत्त्वपूर्ण नोंद मानली जात आहे.
युनिकाॅर्न मँटिस ही मँटोडिया गणातील फायलोथेलिस वंशातील ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. मराठवाड्यातील मँटिस वैविध्याचा अभ्यास करताना ही प्रजाती नैसर्गिक अधिवासात आढळून आली. हा अभ्यास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डाॅ. एम. टी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या संशोधनात संशोधक विद्यार्थिनी हीना खान आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी प्रशांत सोमवंशी यांचा सहभाग राहिला.
या संदर्भाने प्रशांत साेमवंशी यांनी सांगितले की, फायलोथेलिस वंशातील मँटिस आशियाई प्रदेशातील असून, डोकयावर असलेल्या शिंगासारख्या रचनेमुळे आणि काटकीसारख्या शरीररचनेमुळे त्याची विशेष आेळख आहे. या वैशिष्ट्यांमुळे या प्रजातीला युनिकाॅर्न मँटिस तसेच ट्विंग मँटिस अशी नावे देण्यात आली आहेत. शरीरावरील लक्षणीय रंगसंगतीमुळे ही मँटिस सहज आेळखू येत नाही. तज्ज्ञांच्या मत मँटिस हा शेतीसाठी उपयुक्त कीटक असून, त्याच्याकडून पिकांवरील हानिकारक कीटकांचे भक्षण करून नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास मदत होते. वैजापूर तालुक्यातील ही नोंद मराठवाड्यातील जैवविविधतेच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण मानली जात असून, भविष्यातील संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
वैज्ञानिक अभिलेखांनुसार Phyllothelys westwoodii ही प्रजाती प्रामुख्याने आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. चीन आणि श्रीलंका या देशांमध्ये तिची नोंद पूर्वी करण्यात आली असून भारतातही मुख्यतः दक्षिण भारतातील काही मर्यादित भागांमध्ये तिचे अस्तित्व ज्ञात होते. मात्र मध्य भारतात तिच्या नोंदी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
ही प्रजाती पूर्णपणे मांसाहारी (Predatory) असून टिड्डे, पतंग, माश्या, एफिड्स तसेच इतर लहान कीटकांचे भक्षण करते. शिकार पकडण्यासाठी तिचे अग्रपाद (Raptorial forelegs) विशेष प्रकारे अनुकूलित झालेले असतात. त्यामुळे ही प्रजाती नैसर्गिक जैव-नियंत्रणात (Biological control) महत्त्वाची भूमिका बजावते.
पिकांबाबत तज्ज्ञांच्या मते,
मॅंटिस प्रजाती कृषी परिसंस्थेसाठी लाभदायक मानल्या जातात, कारण त्या पिकांना हानी पोहोचवणाऱ्या कीटकांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित करतात. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होण्यास मदत होते आणि पर्यावरणावरील दुष्परिणामही कमी होतात. परिणामी शाश्वत शेती (Sustainable agriculture) प्रोत्साहित होते.

