छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात सोमवारी विविध भागांत अवकाळी पावसाने झोडपले. जालना जिल्ह्यात भाटेपुरी येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. विठ्ठल गंगाधर कावळे (वय २४) असे मृत व्यक्तीचे नाव असून, अनेक भागात वीज पडून जनावरे दगावल्याचे वृत्त आहे. अंबड तालुक्यातील कृष्णा केरुभान सोनवणे यांची घरासमारील भिंत पावसामुळे पडल्याचे सांगण्यात आले.
जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह दुपारी जोरदार पाऊस झाला. वेरुळ परिसरात पडलेल्या पावसाने लेणीच्या वरच्या बाजूने धबधबा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मौजे थेरला येथे गायीचा मृत्यू झाल्याचे तहसीलदारांनी महसूल विभागातील वरिष्ठांना सांगितले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाची एक जोरदार सर येऊन गेली. खुलताबाद, गंगापूर, वैजापूर या तालुक्यातही पाऊस पडल्याचे वृत्त आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे वातावरण बदलले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. बीड शहरातील पेट्रोल पंपावरील पत्रे उडाल्याने दोघेजण जखमी झाले आहेत.
तापमानातही मोठी घट दिसून आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ अंशांपर्यंत खाली आले. दोन दिवसांपूर्वी ते ३७.४ अंशांवर होते.