छत्रपती संभाजीनगर: रमजान ईद सणासाठी कपडे खरेदीस वैजापूर येथे निघालेल्या तीन मित्रांच्या दुचाकीचा व वऱ्हाडाच्या वाहनामध्ये झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वऱ्हाडाचे वाहन न थांबता पसार झाले. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी नोंद झाली आहे.

पोलीस व घटनास्थळावरील प्रत्यक्ष दर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अयान रमजान शहा (वय १९) व अरमान शरीफ शेख (वय १९, दोघे रा. खंडाळा) या दोघांचा मृत्यू झाला असून फैसल लाला खान (वय २०) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अयान याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अरमान यास प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. रमजान ईदच्या सणाला कपडे घेण्यासाठी हे तिन्ही मित्र वैजापूरला येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने खंडाळा गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
अरमान, अयान व फैसल हे तिघे मित्र शनिवारी दुपारी दोन दुचाकीने खंडाळा येथून वैजापूरच्या दिशेने येत होते. शहरापासून पाच किमी अंतरावर जरूळ फाटा येथे पोहचल्यावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली व अपघाताननंतर तेथून पळ काढला. वऱ्हाड घेऊन जाणारा आयशर टेम्पो असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघाताची तीव्रता एव्हढी होती कि दुचाकीचे एक चाक निखळून लांब जाऊन पडले होते. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेद्वारे जखमीना तातडीने वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी अयान यास तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेला अरमान याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेची वैजापूर पोलिसांत नोंद घेण्यात आली आहे.