छत्रपती संभाजीनगर : खाद्य पदार्थ वापरण्याच्या अंतिम तारखेनंतर चिवडा खाण्यात आल्याने दोन वर्षाच्या मुलीची प्रकृती बिघडली. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यास गेलेल्या अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यास मुदत संपलेले खाद्य पदार्थ तुम्ही खाऊन बघा असा आग्रह काही जणांनी वैजापूरमध्ये केला. तातडीने कारवाई होत नसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पान टपरीतून बाद झालेल्या बिस्किटाचे नमुने जप्त करुन ते तपासणीस पाठवले आहेत. मात्र, तातडीने कारवाई न करण्यामागे काही तरी काळेबेरे असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

वैजापूर शहरातील नतीन बहिरट आणि दादासाहेब ठोंबरे यांनी वैजापूर शहरातील लाडगाव रोडवर सलिम पान टपरीवरुन एक चिवड्याचे पाकिट विकत घेतले. हा चिवडा दोन वर्षाच्या लहान मुलीस खाण्यास दिला. या मुलीला मळमळ होऊन चक्कर येऊ लागली, अशी पालकांची तक्रार होती. नातेवाईकांनी मुलीला रुग्णालयात नेले आणि विक्रेता व चिवडा उत्पादनावर कारवाईसाठी अन्न व औषधी विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी अन्न व औषधी विभागातील अधिकारी विवेक पाटील यांनी निरीक्षक प्रशांत अजिंठेकर यांची नियुक्ती केली.

तपासणी दरम्यान पानटपरीवर चिवड्याची पाकिटे मिळाली नाहीत. मात्र, काही बिस्टिकांची खाण्यायोग्य तारीख उलटून गेल्याचे दिसून आले. ‘मोनॅको’ कंपनीचे बिस्किटांचे ही आठ पाकिटे जप्त करण्यात आल्याचे तपासणी अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना सांगितले. १९ ऑगस्ट ही बिस्किटांची खाण्यायोग्यतेची अंतिम तारीख होती. जप्त करण्यात आलेल्या बिस्किटांच्या विक्रीबाबत नोटीस देऊन म्हणणे मांडण्यासाठी सोमवारची तारीख पानटपरी चालकास देण्यात आली. सोमवारी या अनुषंगाने सुनावणी होणार आहे.

तत्पूर्वी तपासणी अधिकाऱ्यास गाठून हे बिस्किटे खा, असा आग्रह तक्रारदार करत होते. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. शेवटी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जमाव शांत झाला. या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासनाने कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दिली नाही. केलेली कारवाई योग्य होती असा दावा अन्न व औषधी विभागाकडून करण्यात आला आहे.