छत्रपती संभाजीनगर – गणेशोत्सव काळात दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण मारहाणीत होऊन एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू मंगळवारी रात्री शिर्डी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहित अनिल पठारे असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या रोहितच्या आईने पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
या घटनेमुळे वैजापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शीतल रोहीत पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयदेव राजपूत, हर्षद राजपूत, मयूर राहाणे, सागर राजुसिंग राजपूत, नितीन होंड, अनिकेत उर्फ अविनाश होंड, गणू राजपूत, अमर राजपूत, सुजीत ठाकूर, अमन उंठवार, सचिन कडे, रोहीत आहेर, संकेत आहेर,प्रतीक साळुंके, प्रमोद वाघचौरे, ज्ञानेश्वर वडाळकर, शंकर राजपूत, पंकज राजपूत, क्रीश राजपूत, सोनू राजपूत, शुभम किरण सिंग राजपूत, सुमीत राजपूत, आनंद राजपूत, गौरव होंड, तुषार आहेर, सुजीत राजपूत या २६ जणांविरुद्ध खुनाचा व ॲट्रासीटीचा वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात चार तास रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. गणेशोत्सव काळात शान ए मराठा गणेश मंडळ आणि हिंदू हृदयसम्राट गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. याच वादातून ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. या वेळी तलवारी, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडींचा वापर करण्यात आल्याने या घटनेत नऊ जण जखमी झाले होते. या प्रकरणी सुरूवातीला ३१ ऑक्टोबर रोजी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जवळपास ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी खून व ॲट्राॅसिटीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच काही नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील रोहितला उपचारासाठी शिर्डी येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी रात्री ११ वाजता त्याचा मृत्यू झाला. युवकाच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि नागरिक संतप्त झाले. रात्री मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले. या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या रोहितच्या आईने पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
बुधवारी संतप्त नागरिकांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या घटनेमुळे वैजापूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
