छत्रपती संभाजीनगर : नांदूर मधमेश्वर जलद गती कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वैजापूर आणि गंगापूरमधील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर आंदोलन केल्यानंतर पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतच घेतला जाईल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनास वैजापूरमधील भाजप नेत्यांचाही पाठिंबा आहे.
जलद गती कालव्यातून किती पाण्याचा हक्क ?
वैजापूर येथे शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी हक्काचे पाणी सोडण्याची मागणी करत करत रस्ता रोको आंदोलन केले होते. तत्पूर्वी पंडित अण्णा शिंदे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी उपोषण केले आहे. या उपोषणास भाजपचे नेते दिनेश परदेशी यांनीही पाठिंबा दिला. आठ अब्ज घनफूट पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आंदोलनास मोठी गर्दी असल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ध्वनीफितीवरून नियोजनही सांगितले. मात्र, शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. या अनुषंगाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. आंदोलना दरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये वादही झाले.
उद्या होणार निर्णय
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. यात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. उपलब्ध असणारे पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी राखून ठेवूनच निर्णय घ्यावे लागतील. जलद गती कालव्यातून वैजापूर आणि गंगापूरच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी डावलले गेले नाही, पण हे निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होतील, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी म्हणाले.
पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील कालवा सल्लागार समितीच्या बैठका झाल्या आहेत. पोलीस संरक्षणात आवर्तन द्यावे, ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र, आंदोलन करणाऱ्यांनी सल्लागार समितीच्या निर्णयाची वाट पहायला हवी, असे राधाकृष्ण विखे म्हणाले. जिथे तीन वेळा आवर्तन केले जात तिथे एकच वेळा पाणी देता येईल, अशी स्थिती आहे, असेही जलसंपदा मंत्री म्हणाले. कुंभमेळ्यासाठी देण्यात आलेल्या पाण्याचा आणि नांदूर मधमेश्वरमधील जलद गती कालव्यातून दिल्या जाणाऱ्या पाण्याचा काही एक संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुटीच्या खोऱ्यातील पिके आणि कोपरगावमधील पिके यात मोठे अंतर आहे. कालवा सल्लागार समितीचे नियोजन आधी करून योग्य वेळेत पाणी द्यायला हवे. पण तसे घडत नाही. दरवेळी जलद गती कालव्यातून पाणी आरक्षणासाठी आंदोलन करावे लागते, हे चुकीचे असल्याचे वैजापूरमधील नेते आणि शेतकऱ्यांची भावना आहे.
