छत्रपती संभाजीनगर: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराड यास जामीन नाकारताना यापुढे पूर्ण वर्षभर झाल्याशिवाय जामिनीसाठी अर्जही करू नका असे आदेशात नमूद केले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने वाल्मिक कराड याचा जेल मुक्काम वाढणार आहे. १७ डिसेंबर २०२५ मध्ये जामीन नाकारला होता. या अनुषंगाने लेखी आदेश समोर आल्यानंतर जामीनी अर्ज करण्यास वर्षभर अटकाव करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘डिले’ आणि ‘डिरेल्ड’ अशी रणनीती वापरली जात असल्याचा आरोप या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडणारे वकील उज्वल निकम यांनी केली होती. या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे हा गावी येऊन गेल्याची माहितीही संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. आता हे प्रकरण सुनावणीस येणार असताना जामीन मिळावा या मागणीसाठी कराड याने सर्वाेच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती नोंगमेकापम कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने कराड यांनी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका निकाली काढताना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिन नाकारण्याच्या आदेशात हस्तक्षेत्र करण्यास नकार दिला.
पवन उर्जा निर्माण करणाऱ्या कंपनीस खंडणी मागणाऱ्यांनी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे खून केला होता. त्याच्या खूनाच्या वेळीचे चलचित्रण केल्याने गुन्हा करणाऱ्या आरोपी विषयी सर्वसामांन्यांमध्ये कमालीचा रोष होता. या गुन्ह्याचा वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचा सरकार पक्षाचा दावा आहे.
वाल्मिक कराड हा नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचा सहकारी मानला जातो. या जवळीकीमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीस जामीन मिळतो का, याविषयी कमालीची उत्सुकता होती. सर्वाच्च न्यायालयाने या पुढे वर्षभर अर्ज करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत. त्यामुुळे खटल्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू असताना वाल्मिक कराड कारागृहात राहणार आहे.
