छत्रपती संभाजीनगर : वसंतदादा साखर संस्थेकडे थकबाकी नसणाऱ्या ४० साखर कारखान्यांच्या क्षेत्रात प्रत्येकी दहा हवामान आधारित केंद्रे उभी करून आता वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या केवळ ५० टक्के पाण्यात ३० टक्के उत्पादन वाढविले जाणार आहे. पहिल्या वर्षी १५ हजार आणि त्यानंतर प्रत्येकी चार हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांकडून घेऊन कारखान्यामार्फत हवामान केंद्रे उभी केली जातील. ठिबक सिंचन करून पाणी किती द्यायचे याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.
माती परीक्षण केल्यानंतर कोणती खते द्यायची, कीड येऊ शकेल काय, आली तर कोणते औषध वापरायचे, किती पाणी वापरायचे याची सर्व माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर तीन सेकंदाच्या आत दिली जाईल. कृषी विज्ञान केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि मायक्रोसॉफ्ट यामध्ये त्रिपक्षीय करार झाला आहे. या हंगामात साधारण ४० साखर कारखान्यांच्या क्षेत्रात ऊस उत्पादनात मोठी वाढ होईल असा दावा केला जात आहे. गेल्या हंगामात प्रति हेक्टर ७३ टन उत्पादकता होती. आता ती एकरी १५० टनावर जाईल. म्हणजे हेक्टरी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, असेही दांडेगावकर म्हणाले.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये याची अंमलबाजवणी होणार असून या वर्षी उसासाठी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन करावे लागणार आहे. सध्या एक वर्ष चालणारे नवे तंत्रज्ञानही निघाले असल्याने यामध्ये नवे बदल दिसतील असा दावा केला जात आहे.