परभणी :  येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ड्रोन प्रशिक्षण केंद्रास भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आता २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता प्रदान केली असून ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्राचा १८० दिवसीय अभ्यासक्रम सुरू करणारे हे भारतातले पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे.

विद्यापीठातील हे दुसरे अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र असून, यापूर्वीचे केंद्र कृषि  अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे आता विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या कृषि  क्षेत्रात ड्रोनचा वापर पीक संरक्षण फवारणी, खत व्यवस्थापन, सर्वेक्षण, पीक निरीक्षण, नकाशांकन तसेच अचूक शेती यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाला प्राप्त झालेली ही मान्यता मराठवाडा तसेच राज्यातील कृषि  शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

ड्रोन नियम अंतर्गत जारी करण्यात आलेल्या परवाना प्रमाणपत्रानुसार या केंद्रास लहान व मध्यम स्वरूपाच्या ड्रोनसाठी दिवस व रात्र प्रशिक्षण देण्यास आता मान्यता मिळाली आहे. २३ जून २०२६ ते २२ जून २०३६ असा या प्रमाणपत्राचा कालावधी असून ही मान्यता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे सहसंचालक मनीष कुमार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, संशोधन व कौशल्य विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून या मान्यतेमुळे विद्यार्थी, संशोधक, शेतकरी, युवक तसेच कृषि  उद्योजकांना अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेऊन आधुनिक कृषि  तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

या केंद्राचे प्रमुख म्हणून प्रा. डॉ. गोपाल शिंदे हे कार्यभार सांभाळणार आहेत. ‘नाहेप’ हा भारतीय कृषि  अनुसंधान परिषद, जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्या अर्थसहाय्याने राबविण्यात आलेला प्रकल्प असून, सन २०१९ ते २०२३ या कालावधीत या प्रकल्पाने विविध उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. या प्रकल्पांतर्गत १५,००० हून अधिक शेतकरी, विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांना प्रशिक्षण, संशोधन व लघु प्रकल्पांसाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यातून विद्यापीठाच्या तांत्रिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे अशी माहिती यावेळी डॉ. शिंदे यांनी दिली. या केंद्राने एग्रीबॉट, एग्रीड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते डेटा सायन्स पर्यंत अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

राज्य, देश व विदेशातील ५५ हून अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी येथे १ ते ३ महिन्यांच्या कालावधीत संशोधन व प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या माध्यमातून १५० हून अधिक संशोधन प्रबंध व पुस्तके प्रकाशित झाली आहेत असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. या प्रशिक्षणाद्वारे आतापर्यंत प्रशिक्षित झालेल्या दोन तुकड्यातील प्रशिक्षणार्थींना नोकरीची संधी मिळाली आहे. सध्या प्रशिक्षणाची तिसरी तुकडी कार्यरत आहे. सन २०३६ पर्यंतच्या नियम व अटींच्या अधीन राहून हे केंद्र कार्यरत राहण्यास मान्यता मिळाल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशिक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.