scorecardresearch

VIDEO: औरंगाबादमध्ये शिवजयंती मिरवणुकीवरून हर्षवर्धन जाधवांची पोलिसांसोबत बाचाबाची; म्हणाले “”मी बोलबच्चन देत नाहीये, माझ्याकडे…”

हर्षवर्धन जाधव व पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं. या शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये मिरवणूक काढली. ही मिरवणूक पोलीस प्रशासनाने रस्त्यात अडवली. यामुळे हर्षवर्धन जाधव व पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं. या शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत हर्षवर्धन जाधव पोलीस महासंचालकांच्या एका पत्राचा संदर्भ देत मी बोलबच्चन देत नाहीये असं म्हणत पोलिसांना जाब विचारताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?

शिवजयंतीनिमित्त माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचं आयोजन केलं. दरम्यान, पोलिसांनी रस्त्यात मिरवणूक अडवत परवानगी नसल्याचं म्हटलं. राज्याच्या उपसचिवांकडून मिरवणुकीला परवानगी नसल्याच्या पत्राचा संदर्भ पोलिसांनी दिला. यावर हर्षवर्धन जाधव यांनी आक्रमक होत उपसचिवांपेक्षा राज्याचे पोलीस महासंचालक पदाने मोठे असल्याचं सांगितलं. तसेच पोलीस महासंचालकांनी मिरवणुकीदरम्यान कोठेही अडथळा निर्माण होणार नाही, असं पत्र पोलीस विभागाला पाठवल्याचं सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

पोलिसांनी असं कुठलंही पत्र मिळालं नसल्याचं सांगितलं. यावर हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याकडे हे पत्र असल्याचं सांगत मोबाईलमधील हे पत्र पोलिसांना दाखवलं. तसेच तुम्ही ज्या कायद्याचं बोलत मिरवणूक अडवत आहात त्याच कायद्याने आम्हाला मिरवणुकीची परवानगी दिल्याचा दावा जाधव यांनी केला.

हेही वाचा : “आम्हाला शिवसेना शिकवू नका”, औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचा वाद चव्हाट्यावर

दरम्यान, पोलिसांनी मिरवणूक अडवल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच फटाकेही फोडले. यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी हस्तक्षेप करत आपण कायदेशीर बाबींवर बोलू म्हणत कार्यकर्त्यांना शांत केलं. तसेच पोलिसांना पोलीस महासंचालकांच्या पत्राचा उल्लेख करत जाब विचारला. हर्षवर्धन जाधव आणि स्थानिक पोलिसांमधील शाब्दिक बाचाबाचीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Verbal fight on shiv jayanti between harshavardhan jadhav and police in aurangabad video viral pbs

ताज्या बातम्या