छत्रपती संभाजीनगर : वेरुळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकास कामात अडथळा आला म्हणून पांढऱ्या चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तिंनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा गुन्हा गुरुवारी उशिरा रात्री दाखल करण्यात आला. शिक्षकाच्या पत्नी अनिता बोरसे यांनी या अनुषंगाने तक्रार दाखल केली. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा म्हणून नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते अंबादास दानवे हेही पोहचले. पोलिसां नीच शिक्षक सुरेश बोरसे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मारहाणीच्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हाणामारी करताना एक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हजर होते, असाही आरोप केला जात आहे. मारहाण होत असताना काहींनी भ्रमणध्वनीवरुन चित्रीकरणही केले असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार घरामध्ये बहीण व भाचे आल्यानंतर जेवणानंतर आईसक्रिम आणि स्वत:ला सर्दी झाल्याने गोळ्या आणण्यासाठी सुरेश बोरसे घराबाहेर पडले होते. त्यांच्याबरोबर १२ वर्षाचा त्यांचा भाचा होता.

रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गल्लीत आराडाओरडा सुरू झाला. बोरसे यांच्याबरोबर गेलेल्या भाच्याने ‘ मामाला कोणीतरी मारत आहे, ’ असा निरोप दिला. काळ्या रंगाची नंबर नसलेल्या एका गाडीत बोरसे बसवले जात होते. बोरसे यांच्या मुलीने गाडीला अडवून ‘ माझ्या वडिलांना कुठे घेऊन जात आहात, असा प्रश्न विचारला. यावर पांढरा शर्ट आणि निळी जिन्सची पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने आम्ही पोलीस आहोत. आमच्या कामात दखल दिली म्हणून आम्ही घेऊन चाललो आहोत, असे सांगितले.

त्यांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी गाडीतील व्यक्तींना वारंवार विनंती करत होतो, असे अर्चना बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद आहे. गाडीमध्ये पतीला खूप वेदना होत होत्या. श्वास घेण्यासही त्रास होत होता, असे दिसून आल्याची अर्चना बोरसे यांनी म्हटले आहे. पुढे बोरसे यांना गाडीतून उतरुन सात – आठ लोक निघून गेले. यानंतर शेजाऱ्याच्या गाडीतून बोरसे यांना वेरुळ येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गाडीतील रुग्णाची स्थिती पाहून छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आले.

तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वेरुळमध्ये शिक्षकास मारहाण करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीच होते असा आरोप आता केला जात आहे. या प्रकरणात पोलीसच बोरसे यांना का मारहाण करण्यात आली. हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकरणात थेट पोलिसांवरच आरोप होत आहेत.