छत्रपती संभाजीनगर – राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या एका कथित कृतीचा निषेध करून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून, या संदर्भातील एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.

पंकजा मुंडे या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी दुपारनंतर  लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यानुसार चाकूर तालुक्यातील जानवळ येथे प्रचाराचा कार्यक्रम होता. यासाठी आल्यानंतर गावातील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन न करताच त्या परतल्याने ग्रामस्थामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याच मुद्यावर पंकजा मुंडे यांनी संतप्त झालेल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पंकजा मुंडे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र चाकूर तालुक्यातील जानवळ येथे प्रचार सभेसाठी जात असताना महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन न करता पुढे गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

जानवळ गावात रस्त्यालगत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ पंकजा मुंडे यांचा ताफा न थांबता पुढे निघून गेला. यानंतर काही वेळातच ग्रामस्थांनी याचा निषेध नोंदवत जोरदार प्रतिक्रिया दिल्या. “डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच तुम्ही मंत्रीपदापर्यंत पोहोचला आहात, मात्र पुतळ्याला अभिवादन करण्याची संवेदनशीलता दाखवली नाही,” असे खडे बोल नागरिकांनी यावेळी सुनावले.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी अवमान झाल्याची भावना व्यक्त करत नाराजी प्रकट केली. निवडणुकीच्या काळात नेत्यांनी समाजभावना लक्षात घेऊन वागणे अपेक्षित असल्याचे मतही यावेळी नागरिकांनी मांडले. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी संतप्त लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या सर्व घटनेचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.