बीड : केजमधील विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास अखेर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे सोपवण्यात आला असल्याचे स्पष्ट होत असून, त्या अनुषंगाने एक पथक शनिवारीच येथे दाखल झाले आहे. येत्या आठवड्यात राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते बीडमध्ये येणार असून, त्याअर्थाने आणि घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव यांच्यावर आरोप होत असल्याने सीआयडीचे पथक दाखल येण्याला महत्व प्राप्त झाले आहे.

केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्येचे पडसाद एक महिन्यापासून जिल्ह्यात उमटले जात असून, आरोपी मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी विलास घुले यांच्या मृतदेहावर होणारे अंत्यसंस्कार ४८ तास रखडले होते. आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत स्वतः केजमध्ये दाखल झाले होते.

यावेळी त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी केजमध्ये मोर्चा काढून बंदही पाळण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे, भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे यांनीही घुले कुटुंबीयांची भेट घेतली. मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणकडून पाच लाखांची मदत केली आहे. आरोपींच्या अटकेसाठी दबाव वाढत असताना जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव यांचाही हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप होऊ लागला. या खून प्रकरणाला राजकीय रंग मिळू लागला.

त्यात घुले हत्या प्रकरण विधिमंडळातही मांडून चौकशीची मागणी केली गेली. दरम्यान सौरव सोनवणे यांची प्राथमिक चौकशीही करण्यात आली. खासदारांच्या बंगल्याची तपासणी झाली. मृत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप तक्रार अर्ज करून केला. पोलिसांनी सुरुवातीला सात आरोपीना व नंतर आणखी तिघांना अटक केली. दरम्यान मागील आठवड्यात (२५ जुलै) रमेश घुले यांनी त्यांना मध्यरात्री खासदार पुत्राच्या नावाने दोघांनी धमकी दिल्याची तक्रार दिली.

त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्याची मागणी केली होती. यानंतर विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक शनिवारी सायंकाळी येथे दाखल झाले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. या प्रकरणातील धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग समोर आल्यानंतर मुंडे यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आता केजमध्ये पुन्हा विलास घुलेच्या रूपात दुसरे खून प्रकरण चर्चेत आल्याने आणि त्यातही राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर आरोप झाल्याने जिल्हाभर सध्या घुले हत्या प्रकरणाचीही चर्चा होत आहे