औरंगाबाद: महिलांना सैन्यदलात संधी देण्याचा मुद्दा अलीकडेच चर्चेत आल्याची पार्श्वभूमी आणि गावची लेक नागालॅंडमधून  सैन्यदलातील खडतर प्रशिक्षण घेऊन परतल्याचे पाहून तिच्या स्वागताला अवघे गाव एकवटले. यात सहभागी झालेल्या वृद्ध महिलांना पाहून गावपातळीवर अजूनही सैन्यदलाविषयीचा किती कमालीचा आदर आहे याचीच प्रचिती गुरुवारी सायंकाळी आली. शिल्पा राजू फरकाडे सैन्य दलात निवड झालेली सिल्लोड तालुक्यातील पहिली महिला ठरल्याचा आनंद आहे, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटल्या. तर सैन्य दलात निवड झालेली शिल्पा ही जिल्ह्यातील पहिली महिला असेल, असे माजी सैनिक गजानन पिंपळे यांनी सांगितले. 

सिल्लोड तालुक्यातील डकला गावची लेक असलेल्या शिल्पा फरकाडेची २०१८ मध्येच आसाम रायफल दलात निवड झालेली होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर शिल्पाला प्रशिक्षणासाठी जाता आले नाही. नऊ महिन्यांपूर्वी तिला प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे पत्र आले आणि शिल्पाने आनंदाने पूर्वाचलातील नागालँड गाठले. तेथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शिल्पा विमानमार्गे गुरुवारी औरंगाबादेत दाखल झाली. तेथून ती ज्या संस्थेत सैन्यदलात जाण्यासाठी शिक्षण घेतले तेथे पोहोचली. तेथे सत्कार करण्यात आला. सिल्लोड तालुक्यात अ्सलेल्या डकला या गावी पोहोचेपर्यंत हळदा या गावीही सत्कार झाला. डकला गावी पोहोचताच गावची लेक सैन्यदलातील प्रशिक्षण पूर्ण करून परतल्याच्या आनंदाने संपूर्ण ग्रामस्थांनी तिचे भव्य स्वागत केले. देशभक्तीपर गीते लावून आणि हार, पुष्पांचा वर्षांव करत शिल्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील वृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. माजी सैनिक गजानन पिंपळे यांच्या हस्ते शिल्पाचा सत्कार करण्यात आला. शिल्पाचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वसतिगृहात झाले. तर अकरावी, बारावी व बीएसस्सी प्रथम वर्षांपर्यंतचे शिक्षण सिल्लोडला झाले. यापूर्वी शिल्पाला मुंबईत वाहतूक पोलीस दलात नोकरीची संधी मिळाली होती. मात्र, शिल्पाचा सैन्यदलात जायचा निश्चय असल्यामुळे तिने ती नोकरी नाकारली. आज तिचा सैन्यदलात निवड झाल्याचा आनंद आहे, असे तिचे मैदानी प्रशिक्षक एस. धनवई व एम. मदार यांनी सांगितले.

मामांना कॅप व सॅल्यूट  शिल्पा ही सर्वसामान्य घरातील मुलगी. आई-वडील व दोन भाऊ, असा तिचा परिवार. पण बेताच्या परिस्थितीमुळे तिचा सांभाळ आजोबा व तीन मामांनी मिळून केला. सैन्यदलात जायचे या तिच्या विचारांना मामा प्रभू साखळे यांनी पाठबळ दिले. त्यामुळे गावात परतलेल्या शिल्पाने वाहनातून उतरताच सैनिकाप्रमाणे ड्रील वॉक करत येत आपली टोपी (कॅप) मामा प्रभू साखळे यांच्या डोईवर चढवली आणि सॅल्यूट केला. तेव्हा अवघा गाव गदगदला. मामांनाही पाठबळ दिल्याचे चिज झाल्याचे वाटले. तशी प्रतिक्रिया त्यांनी ग्रामस्थांजवळ व्यक्त केली.