छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी.सी. यांनी शुक्रवारी पदाचा पदभार स्विकारला. दरम्यान महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली थांबविण्यासाठी प्रयत्न करू असे मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाठ यांनी घेतलेल्या भूमिकेस विरोध सुरू झाला आहे. नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्याचे मनोबल खचविण्याचे काम करू नये असा सल्ला नेते विनोद पाटील यांनी दिला आहे. दरम्यान पदभार स्विकारल्यानंतर पर्यटन विषयावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या प्रशासनात गुरुवारी रात्री तीन सनदी अधिकाऱ्यांची बदली झाली. यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि जी. श्रीकांत यांची बदली झाली. या तिन्ही अधिकाऱ्यांपैकी फक्त जी. श्रीकांत यांची बदली थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी भूमिका मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाठ यांनी जाहीर मांडली. त्यास आता विरोध सुरू झाला आहे.

महापालिकेच्या आयुक्त पदी अमोल येडगे यांची तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पी. एम. मिन्नू यांची बदली केली आहे. यातील जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी पदभार घेतला. जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास यासह सर्वांगिण विकासासाठी काम करू असे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासाला चालना दिली जाईल, असे ते म्हणाले.

महापालिका आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांनी चांगले काम केले असल्याचा दावा मंत्री करत असले तरी त्यांच्या कामावर विधीमंडळ अधिवेशनात आमदार प्रशांत बंब यांनी आक्षेप नोंदविले होते. शहरात नवे अधिकारी येत असताना जुन्या अधिकाऱ्यांसाठी बदली रोखण्याचा प्रयत्न करू असे म्हणणे नव्यासाठी मनोबल खच्चीकरण करणारे ठरू शकेल, असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.