छत्रपती संभाजीनगर – धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाचा ध्वनीचित्रफित पुढे आली आहे. परंडा विधानसभा शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा हा आवाज असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या ध्वनीफितीमध्ये ते मतदारांना पैसे वाटपाबाबत आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
तानाजी सावंत आपल्या कार्यकर्त्याला निवडणूक जिंकण्यासाठी पैशांची चिंता करू नका, असे सांगताना ऐकू येत आहेत. “कोटी-दोन कोटी काय लागतील ते जाऊ दे,” असे विधान त्यांनी केल्याचे ध्वनीफितीमधून आढळून येते. पैशांच्या व्यवहाराबाबतचे तपशील व्हॉट्सॲपवर कळवण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्याला दिल्या आहेत.
तसेच, पैशांवर किती मतदार घेता येतील, याची यादी पाठवण्यासही त्यांनी सांगितले आहे. या संवादादरम्यान सावंत यांनी धाराशीव जिल्ह्यातील शिरसाव, हिंगणगाव, जवळा आणि वाकडी या चार गावांचा विशेष उल्लेख केला आहे. या गावांमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मागे पडायचे नाही, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
मतदानाच्या दिवशीच असा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, विरोधकांकडून यावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर आता तानाजी सावंत काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांना याबाबत विचारले असता आपल्यापर्यंत अधिकृतपणे अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
