छत्रपती संभाजीनगर : ज्या शहरात ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जेथे नव्या औद्योगिक वसाहतीमध्ये ई – वाहनांचे केंद्र विकसित होते आहे, त्या शहरातील वाळुज – तीसगाव रस्त्यावर चार किलोमीटरपर्यंत कचराच कचरा असतो. गेली अनेक वर्षे हा कचरा हटत का नाही, यावरची कारणे शोधली गेली. आणि कचरा कोणी उचलायचा यावरुन ग्रामपंचायत, औद्योगिक वसाहत आणि सिडको या तिन्ही यंत्रणांमध्ये कमालीची अनास्था दिसून येते. विशेष म्हणजे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी बैठक घेतली. अगदी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनीही समन्वयाच्या बैठका घेतल्या पण समस्या आहे तशी आहे. उद्योगनगरीतील भर रस्त्यावरचा कचरा हटता हटत नाही, हे चित्र कायम आहे.
वाळुज – तीसगाव दरम्यान औद्योगिक वसाहतीकडे जाताना शहराच्या कचरा व्यवस्थापनाचे धिंडवडे निघत आहेत, पण कारवाई काही होत नाही. बजाजनगर – सिडको कॉलनी आणि वडगाव कोल्हाटी या भागातील नागरिक रोज रस्त्यावर कचरा फेकतात. तो संकलित करण्याची प्रणालीच अद्याप विकसित झालेली नाही. यामुळे शहरात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या उद्योजकांना ‘ कचरा दर्शन ’ घडतेच. यावर उपाययोजना करण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही, असे उद्योजक आवर्जून सांगतात. या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी वासुदेवराव सोळंके म्हणाले, ‘ खरे तर ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कचरा ग्रामपंचायतीने उचलणे आवश्यक आहे. पण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडूनही ५० टक्के कर घेतला जातो. त्यामुळे त्यांनीही हा प्रश्न सोडवायला मदत केली पाहिजे. तसेच यातील काही भाग सिडको प्रशासनाकडेही आहे. त्यामुळे या अनुषंगाने समन्वय होण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकाही झाल्या आहेत.’
या भागात सिडको प्रशासनाकडून कचरा प्रक्रिया करण्यासाठी एकही भूखंड ठेवलेला नाही. ग्रामपंचायतही यात लक्ष घालत नाही. एमआयडीसीने हात वर केले आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातील कार्यकारी अभियंता गिरी यांना या अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले, ‘हा रस्ता औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे तेथील कचरा उचलण्याची आमची जबाबदारी नाही. अन्य ठिकाणी स्वच्छता आहे. ’
कचरा कोणी उचलायचा हे न ठरल्याने चार किलोमीटरपर्यंत कचऱ्याचे ढिग पडलेले असतात. याच रस्त्यावर कामगार, उद्योजक ये- जा करतात. वारंवार निवेदने दिली जातात. अगदी बैठकाही हाेतात पण प्रश्नही निकाली निघत नाही. जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांना या प्रश्नाच्या अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले, ‘ या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक बैठक घेतली आहे. जबाबदारी वाटून देण्यात येईल. पण एकदा कचरा काढून चालणार नाही. कचरा होणार नाही, अशा प्रकारे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ’ तीन सरकारी यंत्रणा, उच्चपदस्थ अधिकारी, उद्योजकांचा दबाव असतानाही वाळुज ते तीसगाव रस्त्यावर पाच किलोमीटर ‘ कचरा दर्शन ’ अगदी जागितक पातळीवर गुंतवणुकदारांपर्यंत पोहचत आहे.
