पाणी असूनही पुरवठय़ाचीच समस्या!

औरंगाबाद शहराला जायकवाडीतून पाणीपुरवठा होतो.

water
पाणी

मराठवाडय़ातील बहुतांश नगरपालिकांचा पाणीपुरवठा सरासरी तीन दिवसांचा

मराठवाडय़ात या वर्षी चांगला पाऊस झाला. धरणांमध्ये अजूनही पुरेसा म्हणता येईल एवढा साठा आहे, पण मराठवाडय़ातील ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश तालुका ठिकाणच्या गावांना दर तीन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होतो. समस्या पाणी उपलब्धतेची नाही. मात्र, पुरवठय़ाची यंत्रणा किती ढिसाळ आहे, हेच दिसून येत आहे. विशेष म्हणजे दररोज पाणीपुरवठा का होत नाही, त्यात कोणत्या अडचणी आहेत याचा कसलाही आढावा घेतला जात नाही. मागील चार दिवसांपासून पाणीपट्टी वसुलीसाठी अगदी मंत्रालय स्तरापासून पाठपुरवा केला जात आहे. मराठवाडय़ातील नगरपालिका व नगरपंचायतीमधून पाणीपट्टीचे ७७ कोटी ६५ लाखांपैकी आतापर्यंत २७ कोटी १८ लाख रुपये वसूल झाले आहेत.

औरंगाबाद शहराला जायकवाडीतून पाणीपुरवठा होतो. त्यात ४३ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून समांतर पाणीपुरवठा योजनेची नुसतीच चर्चा झाल्यानंतर आजही शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातही अलीकडेच पाइपलाइन फुटल्याने पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मराठवाडय़ातील सर्वात मोठय़ा शहराचे हे हाल आहेत. तालुकास्तरावरील पाणीपुरवठय़ाची अवस्था तर त्यापेक्षाही वाईट आहे. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद या तीन नगरपालिकांमध्ये दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. जालना जिल्हय़ातील अंबड नगरपालिकेत तर ६ दिवसाआड पाणी दिले जाते. जायकवाडी धरणातून २०१४ पासून अंबड शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणी साठवणुकीसाठी जलकुंभच नाहीत, असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी मान्य करतात. अशीच अवस्था बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई येथील नगरपालिकेची आहे. येथील नागरिकांना दर सहा दिवसाआड पाणी सोडले जाते. कारण शहरातील अंतर्गत पाणीपुरवठय़ाची यंत्रणा पूर्णत: निकामी आहे. यासाठी २२ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पैठण वगळता औरंगाबाद जिल्हय़ात दररोज पाणी देणारी एकही नगरपालिका नाही. ज्या लातूर जिल्हय़ात रेल्वेने पाणी दिल्याचे मोठे कौतुक सरकारने करून घेतले. त्या जिल्हय़ात निलंगा शहरात चार दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो. कामगार कल्याण व कौशल्य विकास विभागचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे हे गाव. औसा नगरपालिकेत दर सात दिवसाला एकदा रेणापूरला चार दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो. उस्मानाबाद जिल्हय़ाही अशीच स्थिती आहे. तुलनेने नांदेड जिल्हय़ातील पाणीपुरवठा करण्याचा एक दिवसाआड आहे. अर्धापूर व माहूरमध्ये तीन दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो. जालना जिल्हय़ातील जाफ्राबादमध्ये दर सात ते आठ दिवसाला पाणीपुरवठा होतो. अजून एकही धरण कोरडे पडलेले नाही की त्यातील पाणीही जोत्याखाली गेलेले नाही. बहुतांश वेळा पाणी नसल्याने मराठवाडा तहानलेला असतो. त्यामुळे टँकर लावावे लागतात, असे चित्र दिसत असले तरी पाणी या समस्येपेक्षाही अधिक ते पुरवठा करणारी यंत्रणा कुचकामी असल्याचे नगर परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मत आहे. पाणी असतानाही ते न येणाऱ्या नगरपालिकांची संख्या वाढत आहे. तसेच पाणीपुरवठय़ातील अंतरही केवळ तांत्रिक अडचणीमुळे अद्याप दूर करता आलेला नाही. पााणीपुरवठय़ाची कुचकामी यंत्रणा सदोष असल्याने हे घडत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water supply issue in marathwada

ताज्या बातम्या