छत्रपती संभाजीनगर: मुंबईहून नांदेडकडे निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री (रविवार) एक महिला प्रसूत झाली. वेळीच रेल्वेसेना, लोहमार्ग पोलीस, जीआरपीचे महिला पथक व त्यांचे अन्य सहकारी पोहोचल्याने प्रसूती सुरळीत पार पडली आणि पुढील उपचारासाठी एका रिक्षातून बाळ व बाळंतिणला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या नवजात बाळ व माता सुखरूप असल्याची माहिती मिळाली.
रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी सांगितले की, मुंबई नांदेड राज्य राणी एक्सप्रेसच्या एस-३ या डब्यामध्ये एका २६ वर्षीय प्रवासी महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. रात्री १२.३० च्या आसपासची वेळ होती. संबंधित महिला व तिचा पती नाशिकहून बसले होते आणि सेलू ( जि. परभणी) येथे प्रसूतीसाठीच निघाले होते.
मात्र, छत्रपती संभाजीनगर येण्यापूर्वीच संबंधित महिलेस प्रसूतीकळा सुरू झाल्या. मदतीसाठी धावाधाव सुरू असल्याची माहिती रेल्वे सेनेला मिळाली. आम्ही तत्काळ आमच्या महिला पथकाला तयार ठेवले. तसेच लोहमार्ग रेल्वे पोलीस (जीआरएफ) व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) माहिती कळवली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये याठिकाणी स्ट्रेचर, लांब कपडेची चादर वातानुकूलित डब्यातून उपलब्ध केले. अखेर प्रसूती सुखरूप पार पडली. नवप्रसूत महिलेला व बाळाला पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने दोघांनाही रिक्षातून रुग्णालयात पोहोचावे लागले. या सर्व प्रक्रियेत पोलीस निरीक्षक शरदचंद्र जोगदंड, सहायक निरीक्षक गणेश दळवी यांचे नियोजन व मार्गदर्शन लाभले व ठाणे अंमलदार वाल्मिक कदम, हवालदार भाऊसाहेब खिल्लारे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, आकांशा पंडित, अभिलाषा यांनी नियोजन करून सहकार्य केल्याचे सोमाणी यांनी सांगितले.