छत्रपती संभाजीनगर : एकीकडे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त ध्वजारोहरण सुरू असताना धाराशिवमध्ये एका महिला कामगाराने थकीत वेतनासाठी स्वतःला पेटवून घेतले. धाराशिव शहरातील शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचारी महिला पन्नास टक्के भाजल्याने प्रकृती चिंताजनक आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बीबी किशनराव पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या मागील अनेक दिवसांपासून भूविकस बँकेतील आपल्या हक्काच्या वेतनासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होत्या. मात्र, वारंवार विनंत्या करूनही पदरी निराशाच पडल्याने, अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. १ मे रोजी ध्वजारोहण सोहळ्याचा कार्यक्रम सुरू असतानाच, पाटील यांनी शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ​या घटनेत बीबी पाटील या ५० टक्क्यांहून अधिक भाजल्या आहेत.

त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ​महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनाच्या दिवशीच एका कष्टकरी महिलेला आपल्या न्याय्य हक्कासाठी असा आत्मघाती मार्ग स्वीकारावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “कामगार दिनीच कामगाराचा असा छळ होणे, हे राज्यासाठी भूषणावह नाही,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित महिला कर्मचारी ही भूविकास बँकेतील कर्मचारी होती.

सध्या भूविकास बँक सध्या बंद पडली आहे. या बँकेवर जिल्हा निबंधक अवसायक म्हणून काम पाहतात. त्यामुळे जिल्हा निबंधकांकडे सातत्याने ती तिच्या देय रकमेबाबत मागणी करत होती. तिने जिल्हा निबंधकांना आत्मदहनाचा इशाराही दिला होता. निबंधक कार्यालयाने त्याबाबत पोलीस प्रशासनालाही पत्र देऊन महिला आत्मदहन करू शकते, असे कळविले आहे. त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले. ध्वजारोहणानंतर अचानक भडका उडाला त्यात महिला ६० टक्क्यांहून अधिक भाजली गेली.

या महिलेचे किती दिवसापासूनचे वेतन थकले होते हे समजू शकले नाही. मात्र, भूविकास बँक बंद पडून अनेक वर्षे झाली आहेत. या बँकेतील कर्मचाऱ्यांची देणी अजूनही दिली गेली नाहीत. या महिलेच्या अनुषंगाने माहिती विचारण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना विचारण्यासाठी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.