नोटीस देऊन समक्ष खुलासा करण्याच्या सूचना

प्रशांत परिचारकांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून त्यांना खुलासा करण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे समन्स येत्या चार दिवसात पाठविण्यात येईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. मंगळवारी परिचारकांच्या वक्तव्याने चिडलेल्या सैनिकांच्या पत्नी व माजी सैनिकांनी त्यांची भेट घेऊन आमदार परिचारकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यांना कोणत्याही पदावर ठेवू नये, या मागणीची शिफारसही निवडणूक आयोगाकडे केली जाईल, असेही रहाटकर म्हणाल्या.

माजी सैनिक व सैन्यातील जवानांच्या पत्नींनी आज उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची भेट घेतली. परिचारकांनी केलेले विधान निंदनीय असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तक्रार मांडताना काही महिला अक्षरश: रडवेल्या झाल्या होत्या. या अनुषंगाने निषेध नोंदविण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकातून एक मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी सैनिकांच्या संघटनेचे प्रमुख नारायणराव भोसले म्हणाले की, या विधानाची दखल राज्य महिला आयोगाने घ्यायला हवी. त्यामुळेच रहाटकर यांची भेट घेऊन तक्रार केली. केवळ माफी मागून भागणार नाही तर असे बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांवर राज्य सरकारने कारवाई करणे गरजेचे आहे.

एक दिवस न जेवता बर्फामध्ये पहारा द्यायला त्या आमदारांना सांगा, अशा तीव्र शब्दात जवानांच्या पत्नींनी त्यांच्या मनातील राग व्यक्त केला.