छत्रपती संभाजीनगर : आमावस्या तशी साजरी केली जात नाही. अपशकुनी दिवस मानतात. पण लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात दुपारपासून संदेश दिले जाताहेत, या अंबील प्यायला. सोबतीला अंबील आणि उंडे आहेतच. हे सारे खाण्याचे पदार्थ बरं का ? ताकाला थोडेसे ज्वारीचं पीठ लावून अंबील केलं जातं आणि विविध भाज्याची मुद्दाभाजी असते भज्जी. हे सारे पदार्थ घेऊन दोन जिल्ह्यातील बहुतांश मंडळी उद्या शेतात जेवणाला जायच्या तयारीत आहेत. लातूर महापालिकेच्या तयारीत उमेदवार म्हणून इच्छूक असणाऱ्यांनी जरा अधिकच आमंत्रणे दिली.

येळवस, दर्शवेळ किंवा वेळ अमावस्या अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणाची परंपरा तब्बल सातशे वर्षांची असल्याचे सांगण्यात येते. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा हा भाग पूर्वी निझाम राजवटीत असल्याने येथे कानडी भाषेचा प्रभाव आजही जाणवतो. कानडीत ‘वेल्ली’ म्हणजे पीक. पिकांची पूजा म्हणून हा शब्द रूढ झाला असावा. कानडी भाषेत सात या आकड्याला येळ असे म्हटले जाते. ही सातवी आमवस्या असल्याने येळआमवस्या असे संबोधनअसल्याचे सांगण्यात येते.

या उत्सवाचे स्वरूप निसर्गपूजेचे आहे. शेतकरी शेतात कडब्याची ‘कोपी’ बांधतात. तिचे तोंड पूर्वेकडे असते, जे समृद्धीचे लक्षण मानले जाते. कोपीमध्ये पाच दगड मांडून त्यांची ‘पंचमहाभूते’ किंवा ‘पांडव’ म्हणून पूजा केली जाते. या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती दिली जाते.

या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे चविष्ट आणि आरोग्यदायी ‘वनभोजन’. बाजरीची भाकरी, अनेक पालेभाज्यांपासून बनलेली पौष्टिक ‘भज्जी’, ज्वारीच्या पिठाची ‘आंबिल’ ही या दिवसाची खास मेजवानी असते. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ शरीरासाठी औषधी ठरतात. या सणासाठी दुपारपासून आमंत्रणे धाडली जात असून उद्या लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शहरात आणि गावात संचारबंदीच लागू असल्यासारखे वातावरण असते. कारण सारी मंडळी शेतात असतात.