विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला औरंगाबादेतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी केलेल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. आजचा हा मोर्चा सत्ता परिवर्तनासाठी नाही, तर व्यवस्था परिवर्तनाची आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेच्या नेतृत्त्वातील भ्रष्ट कारभार संपविण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत. हा भाजपाचा मोर्चा नाही, तर औरंगाबादच्या जनतेचा मोर्चा आहे, असंही ते यावेळी म्हणाले. औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोणत्याच समस्येशी काहीच देणंघेणं नाही. ते म्हणतील, मी म्हणतो म्हणून औरंगाबादला संभाजीनगर म्हणा, मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा, नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा” असंही ते म्हणाले.

त्यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटलं की, ‘तुम्ही माझ्या सभेचे पोस्टर्स फाडू शकता, पण जनतेचा आक्रोश तुम्ही मिटवू शकत नाही. आम्ही जेव्हा पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली, तेव्हा महापालिकेने एक रुपया द्यावा, बाकी संपूर्ण निधी राज्य सरकार देईल असा निर्णय घेतला होता. आता सरकार बदलले आणि महापालिकेला ६०० कोटी द्यायला सांगितले. आताच्या राज्यकर्त्यांना औरंगाबादशी काहीच देणंघेणं नाही. मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ हे महाराष्ट्राच्या नकाशावर आहेत, हेच त्यांना ठावूक नसेल,” अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.