छत्रपती संभाजीनगर : बीड येथील एका तरुण कापड व्यावसायिकाने खासगी सावकारी करणारे राजकीय पक्षांशी संबंधित स्थानिक पदाधिकारी व काही खासगी वित्त पुरवठादार संस्थांच्या वसुली प्रतिनिधींकडून कर्ज फेडीसाठी होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. राम दिलीप फटाले (वय ४२), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो काळा हनुमान ठाणा परिसरातील रहिवासी असून, त्याचे संपूर्ण कुटुंब कापड व्यवसायाशी संबंधित आहे.
राम फटाले याने आत्महत्येपूर्वी सहा पानी पत्र लिहून खासगी सावकारी करणाऱ्यांची नावे नमूद केली असून, त्यात सत्ताधारी प्रमुख पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती आहे. त्यांच्यासह कर्ज घेतलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून राम याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे दोषींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर दुपारी मृतदेह स्वीकारण्यात आला व सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. राम फटाले याच्या पश्चात पत्नी, मुले, आई-वडील, भाऊ, काका, असा परिवार आहे.
गुन्हा दाखल
राम फटाले आत्महत्याप्रकरणी सात जणांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यात डाॅ. लक्ष्मण जाधव व उघडे नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. दरम्यान, डाॅ. लक्ष्मण जाधव हे भाजपच्या भटक्या विमुक्त विभागाचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांनी व त्यांच्या पत्नीने पैशांसाठी तगादा लावल्याने राम फटाले याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.