पुण्यातही मोठय़ा हंडय़ा उभारण्याची स्पर्धा शिगेला

dahihandi, dahi handi

दहीहंडीवर र्निबध आल्यामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, त्याच वेळी मोठय़ा हंडय़ा, लाखोंची बक्षिसे, कलावंतांची हजेरी यामधील स्पर्धा पुण्यात वाढीला लागली आहे आणि मुंबईतील गोविंदा पथकांना पुण्यातील मंडळांनी आपलेसे केले आहे.
गोकुळाष्टमी उत्सव ही मुंबईची ओळख. मात्र, गेल्या अनेक वर्षांमध्ये उत्सवाच्या बदललेल्या स्वरूपामुळे आता त्याच्यावर र्निबधही येऊ लागले आहेत. मात्र, पुण्यात आता मुंबईप्रमाणेच गोकुळाष्टमीचा उत्सवी गोंधळ वाढू लागला आहे. मोठय़ा हंडय़ा, लाखो रुपयांची बक्षिसे, मोठे कार्यक्रम, सिने किंवा मालिकेतील कलावंतांची हजेरी, हलते देखावे असे चित्र पुण्यातही दिसू लागले आहे. प्रत्येक चौकातील मंडळांमध्ये आता जास्त बक्षीस कुणाचे, मोठी हंडी कुणाची याची स्पर्धाही सुरू झाली आहे. आता मुंबईतील गोविंदा पथकांना पुण्यातील मंडळांनी आपलेसे केले आहे. सिने कलावंतांच्या हजेरीबरोबरच मुंबई, ठाणे, वसई, रत्नागिरी या ठिकाणची गोविंदा पथके, महिलांची पथके हंडी फोडण्यासाठी येणार असल्याची जाहिरातबाजी मंडळांनी सुरू केली आहे. शहराच्या मुख्य भागापेक्षाही उपनगरांमध्ये दहीहंडीचा धिंगाणा अधिक दिसत आहे. पुण्यातील काही रस्त्यांवर अगदी प्रत्येक चौकात गोकुळाष्टमी उत्सवाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यानुसार अगदी २५ हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत बक्षिसांची रक्कम आहे. या वर्षी मराठी मालिकांमधील कलावंतांना मंडळांकडून अधिक मागणी दिसत आहे.
उत्सवांच्या फलकबाजीकडे दुर्लक्ष
फलक लावून शहराचे सौंदर्य बिघडवू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर महानगरपालिकेने दाखवण्यापुरती कारवाईही केली होती. मात्र, आता उत्सवांच्या जाहिरातीसाठी सुरू झालेल्या फलकबाजीकडे दुर्लक्षच केले जात आहे. मोठी हंडी कुणाची याबरोबरच मोठा फलक कुणाचा, सर्वाधिक फलक कुणाचे याचीही स्पर्धा मंडळांमध्ये आहे. त्यामुळे उपनगरातील अनेक रस्ते मोठय़ा मोठय़ा फलकांनी अडवले आहेत. स्थानिक नगरसेवक, नेते यांच्या मंडळांच्या उत्सवांचे फलक सध्या सगळीकडे झळकत आहेत. गोकुळाष्टमीला चार दिवस असताना आतापासूनच रस्ते खोदूनच उभ्या रहिलेल्या फलकांनी उपनगरे आणि शहरातील काही भागांना व्यापले आहे.